आगामी १०० दिवसात करावयाच्या कामांच्या नियोजन बाबत चर्चा : धनंजय मुंडे

मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे वादात सापडले आहेत. कारण सरपंच हत्या प्रकरण आणि पवनचक्की कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी हे मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात.
यातील काही आरोपी फरार असल्याने धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांना ताकद दिली जात असल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे हत्या आणि खंडणी या दोन्ही प्रकरणांचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर करा, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात आहे. अशातच आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या विविध विभागांच्या बैठकीला मंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित राहिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. या बैठकीबाबत स्वत: मुंडे यांनी सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या घेतलेल्या आढावा बैठकीत मी सहभागी झालो. आगामी १०० दिवसात विभागाने करावयाच्या कामांच्या नियोजन बाबत चर्चा झाली,” अशी माहिती मुंडे यांनी दिली. तसंच स्मार्ट रेशन कार्ड वितरण, रास्त भाव दुकानांचे सक्षमीकरण असे ध्येय निश्चित करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी काही मौलिक सूचना केल्या. त्याचबरोबर ग्राहकांचे हक्क व अधिकार याबाबत प्रचार प्रसिद्धी करून ग्राहकांच्या तक्रारींचे गतीने निराकरण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले, असंही त्यांनी सांगितलं आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी अजूनही फरार असून या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हादेखील अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. कराड आणि हत्या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्यानेच अटकेला विलंब होत असल्याचा आरोप होत आहे. आरोपी अजूनही फरार असल्याने गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून सरकारवरील दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस आणि धनंजय मुंडे हे दोन नेते शासकीय बैठकीच्या निमित्ताने भेटत असल्याने त्यांच्यात बीड प्रकरणावरूनही चर्चा झाली का, याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते.