चेन्नईत ईडीकडून 200 कोटींची मालमत्ता जप्त

चेन्नई : निओमॅक्स ग्रुप ऑफ कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने तामिळनाडूमधील विविध ठिकाणी छापे टाकून मदुराई येथील २०० कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, पीएमएलए कायद्याच्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या संबंधात ईडीने एक्सवर ही माहिती दिली आहे.
या कंपनीवर आर्थिक फसवणुकीचे आरोप आहेत. त्यानुसार कंपनीची एकूण सुमारे २०७ बाजारमुल्याची मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा अन्य तपास सुरू आहे. ईडीने या कंपनीचे मालक कोण आहेत याची माहिती मात्र अजून दिलेली नाही. जप्त मालमत्तेत स्थावर मालमत्ता किती व रोकड किंवा दागदागिन्यांच्या स्वरूपातील मालमत्ता किती याचीही माहिती दिलेली नाही.
गुंतवणुकदारांनी निओमॅक्स प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड विरोधात दाखल केलेल्या तक्रारींनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लिमिटेड आणि तिच्या समूह कंपन्यांना १२ ते २० टक्के व्याजासह जास्त परतावा देण्याचे वचन दिले होते.
तसेच अनेक प्रकल्पांमध्ये लाखोंची रक्कम जमा करण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. कंपनी आणि तिचे प्रवर्तक आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आहे.