
कराड ः कराड ते शामगाव मार्गावर करवडी, ता. कराड गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
बाजीराव किसन पवार (वय 65, रा. पवारवाडी-बोपोशी, ता. जि. सातारा) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत शुभम बाळासाहेब पिसाळ (रा. करवडी) यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करवडी येथील शुभम पिसाळ हे गुरूवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शामगाव रोडवरुन घराकडे निघाले होते. त्यावेळी रस्त्यावर दुचाकी पडल्याचे तसेच नजीकच एका पुरूषाचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. शुभम यांनी जवळ जावून पाहिले असता संबंधित व्यक्तीच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी संबंधिताच्या खिशातील कागदपत्र तपासली असता आधारकार्डवरुन त्याची ओळख पटली. त्यानंतर शुभम यांनी संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवरुन त्याच्या घरी फोन करुन अपघाताची माहिती दिली. तसेच कराड तालुका पोलीस ठाण्यातही याबाबतची माहिती दिली.
अपघातस्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अपघातप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातस्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अपघातप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.