माझ्या पप्पाच्या जिवाला काही झालं तर सरकारला जागेवर ठेवणार नाही
मनोज जरांगे यांची लेक पल्लवी जरांगे हिचा इशारा

जालना : ”माझ्या पप्पाच्या जिवाला काही झालं तर आई जिजाऊंची शपथ घेऊन सांगते, या सरकारला जागेवर ठेवणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे यांची लेक पल्लवी जरांगे हिने दिला.
जरांगे यांचे त्यांच्या पत्नी सौमित्रा जरांगे यांनी अंकुशनगर येथे औक्षण केले. यावेळी जरांगे यांचे सर्व कुटुंब उपस्थित होते. याप्रसंगी जरांगे भावनिक झाले. मुलगा आणि तिन्ही मुलींनादेखील अश्रू अनावर झाले. पल्लवी जरांगे म्हणाली, ”हे सरकार निर्दयी असून, माझे वडील मागील सात महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत.
त्यामुळे ते सात महिन्यांपासून आमच्या सोबत नाहीत. अशात त्यांच्यावर सरकारने मुंबईला जाण्याची वेळ आणली आहे. राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आरक्षण देणार असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन न पाळल्याने ते मुंबईला चालले आहेत. जर येथे त्यांच्या जिवाला काही झाले तर सरकारला जागेवर ठेवणार नाही.”