ताज्या बातम्याराजकियराज्य

कलबुर्गीसाठी काही केलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या : मल्लिकार्जून खरगे

कलबुर्गी : निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी, 26 एप्रिल रोजी पार पडत आहे. निवडणूक प्रचाराला जोर आला असून अनेक ठिकाणी प्रचारसभा, बैठका आणि रो शोचं आयोजन केलं जात आहे.

या प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याबरोबरच मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं आपल्याच पक्षाला मतदान करावं यासाठी प्रत्येक नेता प्रयत्न करत आहे. देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये घरोघरी जाऊन, सभांमधून जोरदार प्रचार केला जात आहे. देशामध्ये प्रामुख्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. असं असतानाच एका प्रचारसभेमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मतदारांना मतदानासाठी आवाहन करताना भावनिक होऊन स्वत:च्याच अत्यसंस्कारासंदर्भात भाष्य केल्याचं पाहायला मिळालं.

आपल्या गृह जिल्ह्यामध्ये म्हणजेच कलबुर्गीमध्ये मतदारांशी संवाद साधताना 81 खरगे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळेस काँग्रेसच्या उमेदवारासाठी मतं मागताना तुम्हाला या उमेदवाराला मतं द्यावीशी वाटली नाहीत तरी मी तुमच्यासाठी थोडं जरी काम केलं असेल असं वाटत असल्यास किमान माझ्या अंत्यंस्काराला तरी या, असं भावनिक विधान खरगेंनी केलं. “काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही मतं दिली नाहीत तर मी असं समजेन की कलबुर्गीत माझं काहीही स्थान राहिलेलं नाही. मी तुमचा विश्वास जिंकू शकलो नाही असं मी समजेन. मी एक आवाहन करु इच्छितो, तुम्ही काँग्रेस उमेदवाराला मत द्या किंवा देऊ नका मात्र मी कलबुर्गीसाठी काही केलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या,” असं खरगे म्हणाले.

मल्लिकार्जुन खरगेंनी 2009 आणि 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र 2019 मध्ये ते पराभूत झाले. कलबुर्गीमधून यंदा काँग्रेसने त्यांचे जावई राधाकृष्ण दोदमणाई यांना उमेदवारी दिली आहे. राधाकृष्ण हे सध्याचे भाजपाचे खासदार उमेश जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढणार आहेत. अफजलपूर या ठिकाणी जावयासाठी आयोजित रॅलीदरम्यान बोलत असताना खरगे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. “मी राजकारणातून कधीही संन्यास घेणार नाही. देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी कार्यरत राहणार आहे. एखाद्या पदावरुन निवृत्ती घेतली जाऊ शकते मात्र आपल्या तत्त्वांपासून आणि सिद्धांतापासून कधीही निवृत्ती घेता येणार नाही. मी राजकारणात आलो आहे तो भाजपा आणि संघाच्या विचारधारेचा पराभव करण्यासाठीच,” असंही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close