
कराड : माजी सहकारमंत्री व काँग्रेसचे नेते स्व.विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र व कोयना सहाकारी बँकेचे संस्थापक चेअरमन ॲड.उदयसिंह विलाराव पाटील यांनी काँग्रेसचा हात सोडून घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा जोरदारपणे असून त्यांच्या या प्रवेशाने जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. याबाबत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे समजते. उदयदादांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे तब्बल 35 वर्ष आमदार राहिलेले व जिल्ह्यात काँग्रेसचे पाईक राहिलेले माजी मंत्री स्व.विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी तहयात काँग्रेसची साथ सोडली नाही. अनेक प्रसंगांना सामोरे गेले. मात्र काँग्रेस सोडली नाही. त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत यावे म्हणून शरद पवारांनी प्रयत्न केले. त्यांनंतर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी 2014 विधानसभेच्या निवडणूकीच्यावेळी जे हवे ते देतो, तुम्ही आमच्या सोबत या अशा आशयाचा प्रस्ताव दिला. मात्र तो प्रस्ताव धुडकावून निवडणूकीत बंडखोरी केली मात्र काँग्रेसचा विचार सोडला नाही. या निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांनी आपले सुपूत्र ॲड.उदयसिंह पाटील यांचा प्रवेश काँग्रेसमध्ये केला, यावेळी त्यांनी केलेले भाषण आजही कराड- दक्षिणमध्ये चर्चेले जाते. काँग्रेस म्हणजे विलासकाका आणि विलासकाका म्हणजे काँग्रेस असे समिकरण होते.
स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा असणारे हे घराणे राजकारणात आले पासून काँग्रेस बरोबर आहे. राज्यातील राजकारणाची समिकरणे बदलत चालली आहेत. राज्यात सत्तेत असलेले सरकार तीन पक्षाचे असले तरी प्रत्येक ठिकाणाहून अनेक नेेते आपआपल्या पक्षांची साथ सोडत आहेत व आपल्या सोईचा पक्ष निवडताना दिसल आहे, याला सातारा जिल्हा अपवाद राहू शकत नाही. सातारा जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. राष्ट्रवादीत बंड करून अजितदादांनी पक्ष आपला केला आहे. मात्र जिल्ह्यात त्यांच्याकडे फक्त एकच आमदार गेला.याची सल त्यांच्या मनामध्ये होती. त्यांनी निवडणूकीपूर्वी अनेकांची चाचपणी केली. मात्र, मकरंदआबा सोडता त्यांच्याबरोबर कोणी गेले नाही. मकरंदआबा त्यांच्या पक्षामुळे मंत्री झाले. तर त्यांच्या बंधूंना खासदारकी मिळाली. अजितदादांनी त्यांच्यावर दक्षिणमधील कोणते नेते आपल्या पक्षात येवू शकतात असे आदेश दिले. त्यानुसार खासदार नितीनकाका पाटील हे सातत्याने वेगवेगळ्या नेत्यांशी संपर्क करताना एैकीवात होते. अशात काहींची नावे चर्चेत आली मात्र प्रत्यक्ष काँग्रेसलाच मोठा धक्का देण्याची तयारी या पक्षाने केल्याचे दिसून आहे. सातारा जिल्हा बँकेचे माजी संचालक, रयत सहकारी कारखान्याचे चेअरमन ॲड. उदयसिंह पाटील हे काँग्रेसमधून दुसऱ्या पक्षात जाणार याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.
प्रत्यक्ष त्यांनी मोजक्या कार्यकर्त्यांशी आपण अजितदादांच्या राष्ट्रवादीत जावूया का? अशी चर्चा केल्याचे समजते. ॲड.उदयसिंह पाटील हे आपल्या रयत संघटनेचा मेळावा बोलवून कार्यकत्याशी संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते राष्ट्रावादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता बळावली असून जर त्यांनी हा निर्णय घेतला तर काँग्रेसला याचा मोठा धक्का बसणार आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांनाही याचा मोठा फटका बसणार हेही निश्चित सध्यस्थिती जिल्ह्यात काँग्रेसची बिकट परिस्थिती असताना, उदयदादा हा निर्णय घेत आहेत त्यांच्याबरोबर अन्य कोण कोणते नेते जातात, यावर पुढील राजकारण अवलंबून आहे.