
कराड : चांगला परतावा देण्याच्या आमिषाने पाचजणांची तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामगोंडा रायगोंडा पाटील (रा. मंगळवार पेठ, कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. साहिल साधमियाँ कादरी (रा. राजकोट, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मंगळवार पेठेत राहणाऱ्या रामगोंडा पाटील यांचे मित्र समीर मुल्ला यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर साहिल कादरी याने त्याच्या कंपनीबाबत केलेली पोस्ट पाहिली. संबंधित कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर तीनपट रक्कम परत मिळण्याचे आमिष त्यामध्ये दाखविले होते.
याबाबत समीर मुल्ला यांची रामगोंडा पाटील यांच्याशी चर्चा झाली. तसेच संतोष पवार, मन्सूर मोमीन, शाहनवाज मणेर या मित्रांबाबतही त्यानुषंगाने चर्चा करण्यात आली. त्यावेळी सर्वांनी कंपनीत गुंतवणूक करण्यासंदर्भात साहिल कादरी याची भेट घेण्याचे ठरवले. त्यानुसार कादरी याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून त्याला कराडात बोलविले. कराडातील वारुंजी फाट्यानजीक असलेल्या हॉटेलात जुलै २०२२ मध्ये साहिल कादरी याची रामगोंडा पाटील व त्यांच्या मित्रांशी भेट झाली. त्यावेळी साहिल कादरी याने त्याच्या ‘ब्लॉकबिट्स’ व ‘बीटीका कॉइन’ या कंपन्यांबद्दल माहिती देऊन कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच जादा परतावा आणि तीनपट पैसे मिळतील, असे आश्वासन दिले. त्यानुसार ११ जुलै ते २८ आॅगस्ट २०२२ या कालावधीत रामगोंडा पाटील यांच्यासह त्यांच्या मित्रांनी कादरी याच्या कंपनीत ३० लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली.
पैशांची गुंतवणूक केल्यानंतर एक वर्षात ज्यादा परताव्यासह रक्कम परत देण्याचे आश्वासन साहिल कादरी याने दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे सर्वांनी पैशाची मागणी सुरू केली. त्यावेळी साहिल कादरी याने उडवाउडवीची उत्तर देत मोबाईल बंद केला. त्यानंतर काही महिने तो फरार होता. काही दिवसांपूर्वी रामगोंडा पाटील व त्यांच्या मित्रांचा साहिल कादरी याच्याशी संपर्क झाला. त्यावेळी त्याने मी कोणतीही रक्कम देणार नाही, मला फोन करून पैसे मागितल्यास तुम्हाला सोडणार नाही. तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणून ठार मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रामगोंडा पाटील यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव तपास करीत आहेत.
… अशी गुंतवली रक्कम
रामगोंडा पाटील व त्यांच्या मित्रांनी जुलै ते आॅगस्ट २०२२ या कालावधीत २० लाख ७१ हजार रुपये ब्लॉकबिट्स या कंपनीच्या बँक खात्यावर भरले. तसेच वेळोवेळी मोबाईल अॅपद्वारे १ लाख ७९ हजार रुपयांची रक्कमही भरली. त्यानंतर वेळोवेळी समीर मुल्ला, संतोष पवार, मन्सूर मोमीन, शहानवाज मणेर यांच्याकडून प्रत्येकी २ लाख याप्रमाणे ३० लाख ५० हजार रुपये साहिल कादरी याने त्याच्या कंपनीत गुंतवणूक करून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.