
कराड : सह्याद्रि कारखान्यावर 750 कोटींचे कर्ज असल्याचा आकडा विरोधकांनी कुठून काढला? ज्याची परतफेड करण्याची क्षमता आहे, त्यांनाच कर्ज दिले जाते. विस्तारवाढीत एकूण खर्च 448 कोटी होता. 384 कोटीत हे काम बसवले. यामुळे कारखान्याची उत्पादकता वाढणार आहे. खासगी व सहकारी कारखाने कर्ज काढूनच होतात. सभासदांनी निश्चिंत राहावे. ऊस दरावर परिणाम न होता, या कर्जाची परतफेड केली जाईल. कर्जाबाबत समोरासमोर चर्चेची तयारी आहे, असे आव्हान कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विरोधकांना दिले.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पी. डी. पाटील पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ पाल (ता. कराड) येथे श्री. खंडोबा मंदिरात झाला. त्यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
सर्व सहकारी कारखान्यावर खासगी कारखानदारांचे संकट घोंगावत आहे. कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांनी हे संकट परतावून लावावे. सह्याद्रिकडे वाकड्या नजरेने बघणारांचा आतापर्यंत बंदोबस्त केला असून भविष्यात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही बाळासाहेब पाटील यांनी दिला ते म्हणाले की, सह्याद्रि कार्यक्षेत्रात उसाचे वाढणारे उत्पादन लक्षात घेऊन कारखान्याची विस्तारवाढ करण्याचा निर्णय घेतला. 2014 ते 2019 या काळात तत्कालीन सरकार ने वेळोवेळी मागणी करुन ही परवानगी मिळाली नाही. त्यांनी विस्तारवाढीला परवानगी दिली नाही. 2019 साली शरद पवार साहेबांनी माझ्यावर सहकार मंत्री पदाचा जबाबदारी सोपवली. त्यावेळी विस्तार वाढीच्या फाईलला मंजुरी दिली. विलंब झाल्याने डीपीआर बदलावा लागला. काम सुरू असताना वादळाने नुकसान केले. या अडचणींना तोंड देत विस्तारीकरण पूर्णत्वास आणले. बॉयलरची चाचणी सुरू होती. त्यावेळी ईएसपी मध्ये बिघाड झाला. तीन कामगार जखमी झाले. काहींनी कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले. दवाखान्यात उपचार घेणाऱ्या कामगारांना बघायला व्हिडिओ, फोटोग्राफर, गाड्यांचा ताफा घेऊन गेले. भेटायला जाण्यात अडचण नाही. परंतु 2021 सालच्या महाशिवरात्रीला कराडच्या एका दवाखान्यात चिफ केमिस्ट मरणयातना भोगत होता. त्याला बघायला का गेला नाही? मी त्यावेळी पालकमंत्री होतो. यांची भाषा काय तर, पालकमंत्र्यांनी अडकवले. असे कुणाला अडकवता येते का? केवळ अपप्रचार करणारी ही प्रवृत्ती आहे. विरोधक सभासदांचा बुद्धीभेद करून कारखान्याची बदनामी करत आहेत. सह्याद्रि अभेद्य आहे. सह्याद्रि हे नाव यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिले होते, हे विरोधकांनी ध्यानात घ्यावे, असे सांगून बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. हा मतदारसंघ यशवंतराव चव्हाण यांचा आहे. तुम्ही कसली भाषा वापरता. सामान्य जनता ती सहन करणार नाही व मतांच्या रुपातून तुम्हाला जागा दाखवून देईल. निवडणुकीच्या निमित्ताने मी कार्यक्षेत्रात 100 गावात सभासदांना भेटलो आहे. वातावरण चांगले आहे. निवडणुकीत 70 उमेदवार असून कपबशी चिन्ह असणार्या पी. डी.पाटील पॅनलच्या 21 उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केले.
कारखान्यासमोर शड्डू मारून अपमान कुणाचा करता?
विधानसभा निवडणुकीत निकाल उलटा लागला. माझा पराभव झाला. तो आम्ही स्वीकारला. व पुन्हा नव्या उमेदीने कामास सुरुवात केली. पराभव झाला तर खचू नये, विजय मिळवला तर उन्माद वाढू देऊ नये. निवडणूक निकालानंतर कारखान्यासमोरच्या पुलावरून मिरवणूक निघाली होती. त्यावेळी कारखाना व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्यासमोर शड्डू मारला. तुमचे वैर माझ्याशी आहे तर माझ्याशी भांडा. ज्या 32 हजार सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे, ज्यांच्या कष्टातून कारखान्याची उभारणी झाली, ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिशा दिली, त्यांचा तुम्ही शड्डू मारून अपमान करता? स्वाभिमानी सभासद तुम्हाला तुमची जागा दाखवतील, अशी टीका बाळासाहेब पाटील यांनी केली.
खासगी कारखाना माझा आहे, असे म्हणू शकता का?
सह्याद्रिच्या सुमारे 32 हजार सभासदांच्या कष्टातून सहयाद्रि कारखान्याची उभारणी झाली आहे. सभासद कारखान्यासमोर उभारून अभिमानाने हा कारखान्याचे माझा आहे, असे म्हणू शकतो. खासगी कारखान्यांसमोर उभे राहून हा कारखाना माझा आहे, असे म्हणू शकता का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
सदर सभेस अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे नाना, दिपक भोसले सोनहिरा कारखाना व्हाईस चेअरमन, कडेगांव, मानसिंगराव जगदाळे, नामदेवराव पाटील, आनंदराव घोडके, आनंदराव कोरे रहिमतपूर माजी नगराध्यक्ष, ॲड. विद्याराणी साळुंखे माजी नगराध्यक्षा, प्रणव ताटे, दुर्गेश मोहिते, लालासाहेब पाटील, माणिकराव पाटील, संजय थोरात, डी. बी. जाधव बापू व पी. डी. पाटील पॅनलकडे अर्ज दाखल केलेल्या परंतु माघार घेतलेले सर्व उमेदवार उपस्थित होते.
यावेळी श्री. भास्करराव गोरे, सज्जनराव यादव, विकास नलवडे, जयवंतराव साळुंखे, वसंतराव कदम काका, राजेंद्र यादव-शिरगांव, शहाजीराव क्षीरसागर, जितेंद्र पवार दादा, प्रकाश जाधव-कडेगांव, अशोकराव पाटील दादा, सौ. संगिताताई साळुंखे, जयवंतराव पाटील-माजी नगराध्यक्ष, देवराज दादा पाटील, अजितराव पाटील-चिखलीकर, सुनिलराव माने भैय्या आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
श्री. सर्जेराव खंडाईत यांनी प्रास्ताविक केले तर आभार श्री. उध्दवराव फाळके यांनी मानले. सदर सभेसाठी सभासदांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.