
कराड : ज्या सह्याद्री कारखान्याची निर्मिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली त्यांचेच नाव कारखान्याला देण्यासाठी संचालकांच्या पहिल्या सभेतच ठराव घेणार असुन आदरणीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री सहकारी साखर कारखाना असे नाव कारखान्याला देणार आहे. आजवर यांनी फक्त चव्हाण साहेबांचे नाव वापरुन राजकारण केले परंतु खऱ्या अर्थाने त्याचे आचार विचार रुजवण्याचे काम आम्ही करु अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली. सभासदांच्या विविध प्रश्नांवर बोलताना त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर हल्ला चढवला.
चरेगाव ता. कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनेलच्या जाहीर सभेत आमदार मनोज घोरपडे बोलत होते. यावेळी मोहनराव माने, महेशबाबा जाधव, सुरेश पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, बाळासाहेब माने, सिध्दार्थ भोसले, विठ्ठलराव देशमुख, प्रदिप साळुंखे, कुलदीप पवार, बळवंत पवार, मदन काळभोर, प्रकाशराव पवार तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार घोरपडे म्हणाले, कराड उत्तरच्या जनतेने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाला आमदार म्हणून निवडून दिलं. साडेतीन महिन्यात शेती पाण्याच्या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने काम केले आहे. खरतर यांच्या वडिलांच्या पासून चाललेली हनबरवाडी धनगरवाडी योजना चाळीस वर्षांपूर्वी झाली नाही मात्र या योजनेला दुसऱ्या टप्प्याला मंजुरी आणली आहे. पाल इंदोली उपसा योजनेला १०० मीटर हेड ची मंजूरी आणली आहे. विकासाचा बॅकलाॅग अडीच वर्षातच भरुन काढणार आहे.
कारखान्याचा खरा मालक सभासद आहे पंरतु मालकाकडून माफीनामा घेऊन यांनी विक्रम केला. माफीनामे घेवून कारखान्याला पाच-पन्नास कोटीचा फायदा झाला का असा सवाल त्यांनी व्यक्त केला. तेव्हा ते मंत्री होते. मंत्री पदाची हवा डोक्यात होती, कारखानाचा मी व माझ्या कुटुंब मालक आहे असे त्यांनी दाखवून दिले. पण खरे मालक कोण दाखवण्यासाठीच ही निवडणूक लावली आहे. जसा हिशेब विधानसभेला झाला तसाच हिशेब या निवडणुकीत होणार आहे. विधानसभेत 40 50 हजार मतांनी निवडून येणार असे सांगितले होते. कारखान्याच्या निवडणुकीत पाच-सहा हजार मतांनी विजयी होणारच असा विश्वास आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.
सभासदांनी निवडणूक हातात घेतली आहे. त्यांची आमदारकीची कवच कुंडल काढून घेतली. कारखान्याचा हिशोब आता सभासद करतील. सभासदांना त्यांच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी वारस नोंदी केल्या नाहीत. तीन वर्षे ऊस कारखान्याला आला पाहिजे ही अट कशासाठी, बहिणींची ऑब्जेक्शन येते असे सांगितले जाते व आमच्या बहिणी दिलदार आहेत. कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत सभासदांना न्याय मिळवून देणार. पक्ष पार्टी गट तट न बघता सरसकट वारस नोंदी करून घेतल्या जातील. आज त्यांना असं वाटलं होतं की आम्हाला कोणी विचारणार नाही पण कराड उत्तर मध्ये यापुढे राजा का बेटा राजा कभी नही बनेगा ज्यांच्याकडे धमक आहे तोच राजा म्हणेल तोच साखर कारखान्याचा चेअरमन होईल हे जनतेने दाखवून दिले आहे.
आमदारकीची ताकद काय आहे यांना २५ वर्षात कळले नाही कारण घराणेशाही आणि विरासत मध्ये यांना मिळत गेले. विधानसभेला त्यांच्या घरासमोर शेड्डू ठोकून गुलाल टाकला होता. सहा तारखेला पुन्हा एकदा शड्डू ठोकून गुलाल टाकणार असे ते म्हणाले. कारखान्यात सत्तांतर झाल्यानंतर संचालकांच्या पहिल्याच सभेत कारखान्याचे नाव बदलून आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री साखर कारखाना असे नाव देणार आहे. यांनी फक्त चव्हाण साहेबांचे नाव घेऊन आजवर गप्पा मारल्या, प्रामाणिकपणाने दोन गुंठे जमीन घेता येत नाही मात्र बावीसशे एकरावर जमीन यांनी कुठून आणली.विस्तार वाढ कारखान्याची झालीच नाही पण यांच्या प्रॉपर्टीची झाली तसेच सह्याद्रीचा कामगार घरच्या कामाला वापरल्याचा आरोप आमदार मनोज घोरपडे यांनी केला. शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठीच व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे आचार विचार आचरणात आणण्यासाठी कारखान्याच्या निवडणुकीत साथ देण्याचे आव्हान त्यांनी केले.
मोहनराव माने म्हणाले, सह्याद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून व पाणी संस्थेच्या माध्यमातून आजवर शेतकरी सभासदांवर अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांना कधीही ऊस बियाने कमी दरात दिले गेले नाही. इरिगेशन संस्थांऐवजी तारळी व मांड या नद्यांच्या दोन्ही बाजूला कॅनाॅल होऊन बिन पैशाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार होते मात्र ते कॅनाॅल कॅन्सल करून इरिगेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये शेतकरी सभासद कर्जबाजारी झाला. पाणीपट्टीत सेटलमेंट करून पार्टी फंडाला पैसे वापरल्याचा आरोप मोहनराव माने केला. उंब्रजची इरिगेशन संस्था याच भानगडीने बंद पडली तशीच वाटचाल चरेगावच्या इरिगेशनची असल्याचे मोहनराव माने यांनी सांगितले.