
कराड : सातारा जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणार्या यशवंतराव चव्हाण साहेबांची ही कर्मभूमी आहे. चव्हाण साहेब हे राष्ट्रवादीचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी राज्यात सहकार, पुरोगामी विचार रुजवला. काँग्रेसच्या माध्यमातून नेतृत्व करताना दिवंगत विलासकाकांनीही तोच यशवंतविचार आयुष्यभर जपला. आज तीच विचारधारा जपणारे काकांचे वारसदार अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आमच्या राष्ट्रवादीसोबत आल्याने हा खर्या अर्थाने यशवंत विचारांचा प्रीतिसंगम झाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
कराड येथे रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, रयत संघटनेचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी त्यांच्या रयत संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांसोबत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीनकाका पाटील, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, महिलाध्यक्ष सोनाली पोळ, कार्याध्यक्ष संजय देसाई, प्रदीप विधाते, सीमा जाधव, विजयसिंह यादव, राजेश पाटील-वाठारकर, जितेंद्र डुबल, सादिक इनामदार, प्रा. धनाजी काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिवंगत ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाकांच्या जिल्ह्यावर असलेला दबदबा सांगताना ना. पवार म्हणाले, विलासकाकांसोबत मी राज्यसभा, जिल्हा बँक, मंत्रीमंडळात काम केले आहे. काकांचा जिल्ह्यावर दीर्घकाळ वचक होता. त्यांनी जिल्हा बँकेला अनेक पुरस्कार मिळवून दिले. आज देशात सातारा जिल्हा बँक एक नंबरची बँक आहे, ही काकांची देण आहे.
२०१४ मध्ये काँग्रेसने काकांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष उभं राहण्याची भूमिका घेतली. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असल्याने आम्ही काकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते निर्णयावर ठाम होते. त्यावेळी जर काकांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली असती तर; त्यावेळचा निकाल वेगळा लागला असता, असे विधानही त्यांनी यावेळी केले.
ते म्हणाले, काकांनी सहकाराचे राजकारण केले. आज त्यांचाच वारसा उदयसिंहांना पुढे चालवायचा आहे. काकांनी निर्माण केलेल्या सर्व संस्था आज आदर्शवत कार्यरत आहेत. त्यांनी निर्माण केलेली संघटना उदयसिंहांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. त्यामुळे उदयसिंहांनी घेतलेला निर्णय कोणत्याही परिस्थितीत चुकू देणार नाही. त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना सर्व प्रकारची ताकद देणार असल्याची ग्वाही ना. पवार यांनी यावेळी दिली. शिवाय मकरंदआबांनी उदयसिंहांना साथ घातली. त्यांनीही प्रतिसाद दिला. त्यामुळे उदयसिंहांना राष्ट्रवादीत योग्य मान, सन्मान देण्याचे काम कारेन. हा माझा शब्द आहे, अशी ग्वाहीही ना. पवार यांनी यावेळी दिली.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, काकांनी 35 वर्षे जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण केले. यशवंतविचार मांडणारे नेते म्हणून काकांची ओळख होती. विलासकाका आणि लक्षणराव तात्यांनी जिल्ह्यावर अनेक वर्ष काम केले. काकांनी दूरदृष्टीने वाकुर्डेसारखा राज्यातील पहिला नदीजोड प्रकल्प केला. आज काकांच्या पश्चात त्यांची रयत संघटना उदयदादांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. दादांना काँग्रेसमध्ये काय मिळाले, हे मी विचारणार नाही. पण, राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तुमच्यावर कधीही पश्चातापाची वेळ येऊ देणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. तसेच एका कुटुंबात खासदार आणि मंत्रिपद फक्त अजितदादाच देऊ शकतात. दादा दिलेला शब्द कधीही माघार घेत नाहीत. त्यामुळे उदयदादांनी निर्धास्त रहावे, अशा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
उदयसिंह पाटील-उंडाळकर म्हणाले, दिवंगत विलासकाकांनी शेवटपर्यंत आपली विचारधारा सोडली नाही. ६०-६५ वर्षे पुरोगामी विचार जोपासला. ती विचारसरणी अबाधित ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे पक्ष प्रवेशासारखा निर्णय घेणे माझ्यासाठी तेवढे सोपे नव्हते. परंतु, बदलत्या परिस्थितीनुसार पुढे जावे, संघटना टिकवावी, असे मकरंद आबांनी सांगितले. विकासासाठी कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे काकांनी ६०-६५ वर्षे उभाकेलेल्या संघटनेला संरक्षण देण्याची मागणी आपण ना. अजितदादांकडे केली. काकांनी प्रस्थापिताविरोधात संघर्ष केला. परंतु, काकां आणि तात्यांनी जिल्ह्यात विकासाची घडी बसवली. त्याचे राजकीय प्रवाह वेगळे असले, तरी वैचारिकरित्या ते एकत्रच होते.
मात्र, संघटना अडचणीत असताना काकांना कौटुंबिकरित्या अडचणीत आणण्याचे काम केले. त्यांनी खचून न जाता संघटनेच्या माध्यमातून पुन्हा जिल्ह्यात काम केले. विकासकामे करून गावे जिल्ह्याच्या नकाशावर आणली. तीच विकासगंगा प्रवाहीत ठेवण्यासाठी, संघटनेची आजची परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला हा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर काकांच्या पश्चात पराभवाने खचून न जाता आपण संघटना बांधत गेलो. कारखाना अडचणीत असताना काकांनी भागीदारीवर चालवला. आज तो कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे आणि उद्याही तो त्यांच्याच मालकीचा राहील, असेही त्यांनी यावेळी संगितले.
याप्रसंगी रयत कारखान्याच्या नूतरणीकरणासाठी ना. अजितदादांनी मार्गदर्शन करावे, वाकुरडे योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचा सर्वे झाला आहे, त्यासाठी निधी द्यावा. २२०० हेक्टर शेतजमीन ओळीतखाली आणण्यासाठी आवर्तनात बदल करून नियमित पाणी मिळावे. पाचवडेश्वर पुलाच्या प्रकल्पग्रस्तांचे चार कोटींचा निधी द्यावा, दक्षिणेतील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधी द्यावा, दत्त चौकातील एमएसईबीच्या विद्युत तारा भूमिगत करून चौकाचे सुशोभीकरण करावे, आदि मागण्या करत आमची विकासाची भूक आहे. आम्ही काम करायला कुठेही कमी पडणार नाही. राष्ट्रवादी तालुका, जिल्ह्यात पुन्हा रुजवण्याचे काम आम्ही जोमाने करू. आमच्या पाठीमागे सामाजिक, राजकीय, विकासाची ताकद उभी करावी. जिल्ह्यात पुन्हा पुरोगामी विचारांची ताकद उभी करू, अशी ग्वाही उदयसिंह पाटील यांनी ना. पवार यांना दिली.
बाळासाहेब सोळसकर म्हणाले, काकांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले आहे. आज त्यांच सुपुत्राचा आमच्या पक्षात प्रवेश होत असल्याचा आनंद आहे. काकांच्या नंतरही रयत संघटना उदयदादांच्या पाठीशी उभी राहिली. त्या संघटनेचेही त्यांनी यावेळी आभार मानले. तसेच विलासकाका आमदार, मंत्री होते. उदयदादाही त्याच रस्त्याने गेले पाहिजेत. ते आमदार, मंत्री झाले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.
प्रस्ताविकात प्रा. काटकर यांनी अॅड. उदयसिंह पाटील यांच्यासह रयत संघटनेचे कार्यकर्ते आणि बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, कोयना बँक, रयत साखर कारखाना, कोयना दुध संघ, पतसंस्था, शिक्षण संस्था, वस्त्रोद्योग आदि संस्थांचे चेअरमन, व्हाईट चेअरमन, संचालक यांचाही अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश झाला असल्याचे सांगितले. तसेच आता कार्यकर्त्यांची मरगळ दूर होऊन हा जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीमय होईल, असेही त्यांनी सांगितले. वसंतराव जगदाळे यांनी आभार मानले.