साताऱ्यात झळकले महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे पोस्टर

सातारा : साताऱ्यात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अजून सुटलेला नाही, मात्र उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वारं उदयनराजे यांच्या बाजुनं वाहायला लागल्याचं पाहायला मिळत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोन दिवसापूर्वी भेट झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांना तिकीट फायनल झाल्याच्या बातम्या सोशल मीडिया द्वारे समोर आल्या होत्या. आता दिल्लीवारीनंतर उदयनराजे प्रथमच साताऱ्यात येत आहेत.
उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत करण्याचा बेत आखला आहे. यानिमीत्तानं त्यांचं एक पोस्टर तयार करण्यात आलं असून, ते चांगलंच व्हायरल झालं आहे. या पोस्टरवर ‘भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा भव्य स्वागत सोहळा’ असा मजकूर छापण्यात आला आहे. या पोस्टरवर उदयनराजे यांच्यासोबत भाजप नेत्यांचे तसेच कमळ या चिन्हाचा फोटो आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. महायुतीकडं उदयनराजे भोसले यांच्या एवढा ताकदीचा उमेदवार दुसरा नाहीये, यामुळं साताऱ्यात फक्त उदयनराजे असा नारा उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे.