
कराड ः सामाजिक सलोखा कायम रहावा यासाठी कराड शहर, तालुक्यामधील गुन्हे, गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांना प्रतिबंध व्हावा या हेतुने पोलिसांनी पोलिस रेकॉर्डवरील १८३ जणांची आज पडताळणी केली. पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर यांनी संबंधितांना सोशल मिडीयाचा वापर करुन समाजात भिती व दहशत निर्माण केल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा संबंधितांना आज दिला.
कराड शहर, कराड तालुका, उंब्रज, तळबीड, मसुर पोलीस ठाणे हददीतील शरिराविरुध्द, मालमत्तेविरुध्द, शस्त्रास्त्र कलम, खंडणी, अंमली पदार्थ व इतर गंभीर गुन्हे दाखल असलेले अभिलेखावरील गुन्हेगार यांचे विरुध्द प्रतिबंधक कारवाई तसेच माहिती संकलन व गुन्हेगारांचा अभिलेख अदयावत करणेबाबतचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आगामी निवडणुका, महत्वाच्या व्यक्तींचे दौरे, धार्मिक सण, उत्सव शांततेत व सलोख्याचे वातावरणामध्ये पार पडावेत यासाठी पोलिस अधिक्षक समीर शेख, अतिरीक्त पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शाखाली ही मोहिम हाती राबवण्यत आली. त्यात पोलीस रेकॉर्डवरील १८३ गुन्हेगारांच्या हालचाली पडताळणी करुन त्यांची विहीत नमुन्यात माहिती नोंदवून ती अदयावत करण्यात आली. क्रियाशिल असणाऱ्यांविरुध्द स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांचे मार्फत फौजदारी प्रक्रीयेअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या. त्यासाठी प्रत्येक गुन्हेगाराचे सविस्तर रेकॉर्ड तयार करण्यात आले आहे. सोशल मिडीयाचा वापर करुन त्याव्दारे समाजात भिती व दहशत निर्माण करणारे, गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांना लेखी नोटीसीव्दारे समज देण्यात आली. पोलिस उपाधिक्षक ठाकुर, पोलिस निरीक्षक अरुण देवकर, के. एन. पाटील, राजेंद्र मस्के, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमीत बाबर, प्रंशात बधे, किरण भोसले, विठठल शेलार, पोलिस उपनिरीक्षक पंतग पाटील, सुभाष फडतरे, अझरुददीन शेख, राजेंद्र पवार, संपत भोसले, सतिश जाधव, तानाजी माने यांच्यासह पोलस कर्मचाऱ्यांनी ही मोहिम राबवली. कराड पोलिस उपविभागामार्फत क्रियाशील गुन्हेगारांवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यात दोन गुन्हेगारी टोळयावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याात आली आहे. त्याचबरोबर १६ जणांवर सातारा जिल्हयातून एक, दोन वर्षासाठी हददपारीची कारवाई करण्यात आली आहे.