
कराड : कराड येथे सलग पाच दिवस पार पडलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा मंगळवारी सायंकाळी उत्साहात समारोप झाला. शेती, पशुपालन, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि ग्रामीण अर्थकारण यांचा संगम असलेल्या या प्रदर्शनात २५ ते ३० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल झाल्याचे सांगितले जात असून, १२ लाखांहून अधिक शेतकरी, नागरिक व ग्राहकांनी या कृषी पंढरीला भेट दिल्याने प्रदर्शनाने यंदा नवे विक्रम प्रस्थापित केले.
कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने, राज्य शासनाचा कृषी विभाग, सातारा जिल्हा परिषद कृषी विभाग व आत्मा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन, विसाव्या वर्षीही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरले.
या प्रदर्शनात कृषी यांत्रिकीकरण, शेती अवजारे, ट्रॅक्टर, सोलर सिस्टिम, हेल्थ अॅण्ड वेल्थ प्रॉडक्ट्स, एज्युकेशन, शेतीपूरक व्यवसाय, घरगुती उपयोगाच्या वस्तू, ब्युटी प्रॉडक्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील शेकडो स्टॉल्स उभारण्यात आले होते.
मसाले, लोणचे, पापड, हळद, गुळ, काकवी, बेकरी प्रॉडक्ट्सपासून ते अगरबत्ती आणि ट्रॅक्टरपर्यंत सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध होत्या.
दहा रुपयांपासून ते काही लाख रुपयांपर्यंतच्या वस्तूंची थेट खरेदी-विक्री झाली, तर सोलर सिस्टिम, शेती अवजारे, ट्रॅक्टर यांसारख्या महागड्या वस्तूंसाठी अॅडव्हान्स बुकिंगवर लाखो रुपयांचे व्यवहार झाले.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, उत्पादन खर्च कमी करून नफा कसा वाढवावा, याबाबत लाईव्ह मॉडेल्स, प्रात्यक्षिके, तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
यासोबतच फळे, फुले, भाजीपाला, ऊस आदी कृषी उत्पादनांच्या स्पर्धा, पशुपक्षी प्रदर्शन, शेळी-मेंढी स्पर्धा, श्वान स्पर्धा, तसेच प्रयोगशील व उत्पादक शेतकऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला.
या प्रदर्शनाचा केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक पैलूही ठळकपणे समोर आला आहे. महिला बचत गटांना मोफत स्टॉल्स, एचआयव्ही व गुप्तरोग तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदान शिबिरे यासोबतच, प्रदर्शनातील शेती उत्पादनांचा अपव्यय टाळत कोळे येथील जिजाऊ अनाथ आश्रमातील मुलांसाठी फळे, भाजीपाला देण्याचा उपक्रम विशेष चर्चेचा ठरला.
उद्घाटन व समारोप समारंभात मान्यवरांनी हे प्रदर्शन म्हणजे “भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या नावाला साजेसे” असल्याचे आवर्जून नमूद केले.
तसेच “लोकनेते स्व. विलासराव पाटील उंडाळकर काका यांचा शेतकरी केंद्रस्थानी ठेवण्याचा उद्देश, प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचे काम या प्रदर्शनातून होत असल्याचे”, मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
रयत साखर कारखान्याचे चेअरमन व रयत समूहाचे मार्गदर्शक अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे व सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नातून, तसेच शासन व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सहकार्यातून हे प्रदर्शन यशस्वी झाले.
विसाव्या वर्षीही हे प्रदर्शन शेतकऱ्यांना आधुनिक, किफायतशीर, अर्थकारण सांभाळणारी आणि नफा मिळवून देणारी शेती करण्याची दिशा देणारे ठरले आहे. जगाच्या गरजा लक्षात घेऊन शेतीतून आरोग्यदायी उत्पादने निर्माण करण्याचा संदेश देत, कराडमधील यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाने पुन्हा एकदा आपली ‘कृषी पंढरी’ ही ओळख ठळक केली आहे.
डायनॅमिक इव्हेंटचे दर्जेदार नियोजन; लाखोंच्या गर्दीतही शिस्त आणि सुरक्षिततेचा आदर्श…
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनामागे डायनॅमिक इव्हेंट या संस्थेने केलेले काटेकोर आणि दर्जेदार काम विशेष उल्लेखनीय ठरले. हिवाळ्यातील गार वारे, पावसाची शक्यता, दिवसेंदिवस वाढत जाणारी लाखोंची गर्दी, प्रदर्शनात येणारे शेतकरी, नागरिक, त्यांच्यासोबतच प्रदर्शनासाठी आणण्यात आलेली जनावरे व पशुपक्षी, या सर्वांचे नियोजन, काळजी आणि नियंत्रण ठेवणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. माईक सिस्टीमपासून ते स्टेज व्यवस्थापनापर्यंत, पियरलेस डोमची उभारणी, स्टॉल्सची अंतर्गत सुटसुटीत व आकर्षक रचना, महिला बचत गटांना देण्यात आलेल्या मोफत स्टॉल्समधील सौंदर्यपूर्ण मांडणी, आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अन् प्रत्येक बारकाव्यावर डायनॅमिक इव्हेंटने स्वतः लक्ष केंद्रित केले. कुठेही गर्दी-गोंधळ होऊ नये, कोणतीही विपरीत घटना घडू नये, लाखोंच्या उपस्थितीतही प्रदर्शन पाहताना कोणालाही गैरसोय होऊ नये, तसेच प्रत्येकाला प्रदर्शनाचा आनंद घेता यावा आणि काहीतरी नवीन शिकता यावे, या सर्व जबाबदाऱ्या डायनॅमिक इव्हेंटने समर्थपणे पेलून दाखवल्या. यामुळे प्रदर्शनातील शिस्तबद्ध वातावरण, सुरक्षितता आणि सुटसुटीत नियोजनाची सर्वत्र प्रशंसा होत असून, डायनॅमिक इव्हेंटचे अधिकारी व कर्मचारी यांचे कार्य कौतुकास्पद ठरत आहे.

