कृषीराज्यसातारा

कराडच्या कृषी प्रदर्शनात लोकहिताचा आदर्श 

३२५ युनिट रक्तसंकलन, शेकडो जणांना नेत्र व एचआयव्ही–सीपीलीसी मोफत तपासणीचा लाभ

कराड : शेतकऱ्यांना शेतीतील अद्ययावत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची माहिती देतानाच सामाजिक भान जपणारे उपक्रम राबविण्यात कराड शेती उत्पन्न बाजार समिती आणि शासनाच्या विविध यंत्रणांनी पुढाकार घेतल्याचे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कराड बाजार समिती, राज्य व जिल्हा परिषद कृषी विभाग, आत्मा प्रकल्प यांच्या पाठबळामुळे प्रदर्शनातील सेवाभावी उपक्रम यशस्वी ठरले असून हजाराहून अधिक गरजूंना थेट लाभ मिळाला आहे.
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आतापर्यंत ३२५ हून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले असून यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासोबतच २०० हून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून अल्प दरातील चष्म्यांचा लाभही अनेकांना मिळाला आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांमध्ये ५०० ते ७०० रुपयांपर्यंत खर्च येणाऱ्या एचआयव्ही व सीपीलीसी तपासणीचा लाभ तब्बल ५७६ हून अधिक जणांनी मोफत घेतला आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाला साजेसे लोककल्याणकारी कार्य आणि लोकनेते स्वर्गीय विलासकाका पाटील उंडाळकर यांचा कृषी प्रदर्शनामागील उदात्त हेतू या उपक्रमांमधून प्रत्यक्षात साकार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शहरातील शेती उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजार तळावर गेले चार दिवस सुरू असलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात यंदाच्या विसाव्या वर्षी शेतकऱ्यांना शेतीतील अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना मोफत स्टॉल उपलब्ध करून देत हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लाभ कराड तालुक्यातील बचत गटांशी निगडित सुमारे ४१ हजारांहून अधिक महिलांना होणार असून महिला सक्षमीकरणाला गती देण्याचा हा प्रयत्न विशेष लक्षवेधी ठरत आहे.
सामाजिक भान जपत प्रदर्शनामध्ये दोन स्वतंत्र स्टॉल रक्तदान शिबिरासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत रक्तदात्यांना आवाहन करून रक्त संकलन सुरू असून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शन संपण्याच्या एक दिवस आधीच गत चार दिवसांत ३२५ हून अधिक युनिट रक्त संकलन झाले आहे. या शिबिरामध्ये रक्तदात्यांची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना सन्मानपत्र देण्यात येत आहे. बालाजी ब्लड बँक सातारा आणि विटा ब्लड सेंटर यांच्या माध्यमातून ही शिबिरे सुरू असून विटा ब्लड सेंटरचे डॉ. ए. एन. गवराजे, जनसंपर्क अधिकारी पल्लवी आपटे, आरोग्य कर्मचारी तन्वी आत्तार आणि तंत्रज्ञ कोमल सावंत हे या उपक्रमात योगदान देत आहेत. निवडणूक आचारसंहितेमुळे मागील काही काळात रक्तदान शिबिरांवर मर्यादा आल्याने ब्लड बँकांमध्ये निर्माण झालेला तुटवडा कमी करण्यास या उपक्रमातून हातभार लागणार आहे.
जिव्हेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अल्प दरात नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले असून आतापर्यंत २०० हून अधिक गरजूंनी याचा लाभ घेतल्याची माहिती ट्रस्टचे समन्वयक संकेत बुरसे यांनी दिली.
दरम्यान, साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले, उंडाळे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उंडाळे ग्रामीण रुग्णालय आणि सेवाभावी संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शनात येणाऱ्या नागरिकांसाठी एचआयव्ही व सीपीलीसी मोफत तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमासाठी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य समुपदेशक किरण कांबळे, सेवा संस्थेच्या विभागीय निरीक्षक दिपाली कचरे, लिंक वर्कर नम्रता ताटे, अश्विनी पाटील, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचारी प्रियंका पांढरपट्टे आणि आरोग्य समुपदेशक प्रणिता जाधव परिश्रम घेत आहेत.
लिंक वर्कर योजना हा प्रकल्प सातारा जिल्ह्यातील १०० गावांमध्ये राबविण्यात येत असून पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास त्यांना एआरटी उपचार प्रणालीशी जोडून मृत्यूचे प्रमाण कमी करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रदर्शनात तपासणी करणाऱ्या नागरिकांची माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जात असल्याने नागरिकांनी निर्भयपणे या मोफत सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन उंडाळे व ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालय आणि सेवाभावी संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रदर्शनामध्ये सुरू असलेल्या या सर्व लोकहिताच्या सेवाभावी उपक्रमांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे आणि संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close