राज्यसातारा

नवीन अथवा दुबार रेशन कार्ड काढण्यासाठी ज्यादा घेतलेल्या पैशांमध्ये अधिकाऱ्यांचा वाटा ? (भाग दहावा)

कराड : नवीन तसेच दुबार रेशन कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत कराड परिसरात गंभीर गैरप्रकार होत असल्याची जोरदार चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. शासनाने अत्यल्प शुल्क निश्चित केलेले असतानाही प्रत्यक्षात नागरिकांकडून मोठ्या रकमा उकळल्या जात असल्याचे बोलले जात असून, या प्रकारामुळे संतापाची लाट उसळताना दिसत आहे.

शासन नियमांनुसार नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी पिवळ्या रेशन कार्डसाठी 10 रुपये, केसरी रेशन कार्डसाठी 20 रुपये आणि पांढऱ्या रेशन कार्डसाठी 50 रुपये इतकेच शुल्क आकारणे अपेक्षित आहे. तसेच दुबार रेशन कार्डासाठी पिवळ्या रेशन कार्डला 20 रुपये, केसरी रेशन कार्डला 40 रुपये आणि पांढऱ्या रेशन कार्डसाठी 100 रुपये इतकीच रक्कम घेण्याचा स्पष्ट नियम आहे.

मात्र प्रत्यक्षात या नियमांना केराची टोपली दाखवत नागरिकांकडून मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात असल्याची चर्चा रंगली आहे. कराड पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिक सांगत आहेत की, रेशन कार्ड काढण्यासाठी 500 रुपये ते 5000 रुपये पर्यंत रक्कम घेतली जात असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या व्यवहारात अधिकाऱ्यांचाही थेट सहभाग असल्याची चर्चा कार्यालयामध्ये तसेच सर्वत्र पसरली आहे. घेतलेल्या रकमेपैकी तब्बल 50 टक्के वाटा अधिकाऱ्यांकडे जात असल्याचे बोलले जात असून, या आरोपांमुळे संपूर्ण यंत्रणेबद्दल संशयाचे सावट निर्माण झाले आहे.

रेशन कार्डसारख्या अत्यावश्यक आणि सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित सेवेमध्येच जर अशा प्रकारे पैशांची उकळपट्टी होत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे मागायचा असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. अनेकांना आपल्या हक्काच्या सेवेसाठीही जादा पैसे मोजावे लागत असल्याची भावना तीव्र होत आहे.

एकूणच, कराड पुरवठा विभागातील या चर्चेमुळे प्रशासनाची प्रतिमा धुळीस मिळत असल्याचे चित्र आहे. 500 रुपये ते 5000 रुपये पर्यंत पैसे घेतले जात असल्याची चर्चा आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांचा 50 टक्के वाटा असल्याचे बोलले जात असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कठोर पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

पुढील भागात – पैशांमध्ये वाटा नसेल तर खाजगी कर्मचाऱ्यांचा पगार कोण करत?

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close