
कराड : कराड येथील पुरवठा विभागातील कामकाजाबाबत सध्या गंभीर स्वरूपाच्या चर्चा पुढे येत असून प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेले अव्वल कारकून, लिपिक व शिपाई हे त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांपासून दूर राहून इतर कामांमध्ये गुंतलेले असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आणि जबाबदारीच्या तत्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
शासकीय सेवकांची नियुक्ती ही नागरिकांना आवश्यक सेवा वेळेवर व नियमांनुसार मिळावी या उद्देशाने करण्यात येते, परंतु संबंधित कर्मचारी त्यांच्या पदाच्या कर्तव्यांचे पालन करत नसल्याची चर्चा पुढे येत असल्यास, ही बाब कर्तव्यच्युतीच्या चौकटीत बसणारी असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित होत आहेत.
विभागातील नियमित कामकाज हे नियुक्त कर्मचाऱ्यांकडून न होता इतर लोकांकडून केले जात असल्याचे बोलले जात असल्याने शासकीय नियम व कार्यपद्धतीचे उल्लंघन होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शासकीय कार्यालयात अधिकृत आदेशाशिवाय अशा प्रकारे कामकाज पार पडत असल्यास ती गंभीर बाब मानली जाते.
शासनाकडून नियमित वेतन घेत असताना संबंधित कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित काम होत नसल्याची चर्चा असल्यास सार्वजनिक निधीच्या योग्य वापराबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. यामुळे उत्तरदायित्वाची भावना कमी होत असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.
कार्यालयीन कामकाजामध्ये अनियमितता वाढत असल्यास पारदर्शकतेस बाधा निर्माण होऊन नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे एकूणच कार्यपद्धतीवर संशयाचे वातावरण तयार झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करणे, संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे आणि आवश्यक ती शिस्तभंगात्मक कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी पुढे येत आहे. अन्यथा शासकीय यंत्रणा केवळ वेतन घेण्यापुरती मर्यादित राहिल्याची भावना अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पुढील भागात – शासकीय धान्य गोदामाची सुरक्षा खाजगी वॉचमनकडे?

