राज्यसातारा

कराड-मलकापूर फ्लायओव्हरखालील रखडलेली कामे तातडीने पूर्ण करा

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना

कराड : कराड व मलकापूर शहरांवरुन जाणारा फ्लायओव्हर नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पण फ्लायओव्हरखालील दोन्ही बाजुचे मुख्य रस्ते, सेवा रस्ते आणि गटरांची कामे अपूर्ण असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर येथील प्रकल्प संचालकांना पत्र देऊन, ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना केली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या पत्रात आ.डॉ. भोसले यांनी म्हटले आहे, की कराड व मलकापूर शहरांदरम्यानचा फ्लायओव्हर सुरू झाल्यानंतर त्याखालील दोन्ही बाजूंचे मुख्य रस्ते व सेवा रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीदरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय अपूर्ण कामांमुळे या ठिकाणी बेकायदेशीर पार्किंगलाही चालना मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने त्याचा वाहतुकीवर गंभीर परिणाम होत आहे. गटारे वारंवार तुंबत असून त्यातील सांडपाणीदेखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत असल्याने, स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन, फ्लायओव्हरखालील रस्ते व गटारांची कामे तातडीने पूर्ण करावीत.
आमदार डॉ. भोसले यांनी विशेषतः कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंतचा मुख्य रस्ता, सेवा रस्ते आणि गटारांची रखडलेली सर्वच कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना पत्राद्वारे केल्या आहेत. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास वाहतूक अधिक सुरळीत होईल तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्यांपासून मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close