राज्यसातारा

वैशाली राजमाने यांचे स्वतःच्याच पत्रातून संशयास्पद स्पष्टीकरण! १८ रास्तभाव दुकानांच्या परवाना नूतनीकरणावर प्रश्नचिन्ह; सह्या नजरचुकीने राहिल्याचा खुलासा म्हणजे नेमके काय? परवाने नूतनीकरण झालेच नव्हते तर धान्य वितरणाची मंजुरी कोणत्या अधिकाराने दिली? तक्रारीनंतर जुन्या परवान्यांवर सह्या करून नोंदवहीतील त्रुटी झाकण्याचा प्रयत्न झाला का?

विश्व सिटी न्यूज विशेष वृत्तमालिका भाग - १४१ वा

कराड : सातारा जिल्हा पुरवठा विभागातील प्रशासकीय कामकाजाचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला असून, कराड तालुक्यातील १८ रास्तभाव धान्य दुकानांच्या परवाना नूतनीकरण प्रक्रियेने जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांना थेट प्रश्नांच्या केंद्रस्थानी आणले आहे. परवाना नूतनीकरणाच्या नोंदवहीमध्ये आवश्यक स्वाक्षऱ्या नसल्याबाबत लेखी तक्रार दाखल झाल्यानंतर स्वतः जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या पत्रात संबंधित स्वाक्षऱ्या नजरचुकीने राहिल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र, हा खुलासा नेमका कोणत्या वस्तुस्थितीवर आधारित आहे? परवाने प्रत्यक्षात नूतनीकरण झाले होते की नव्हते? जर नूतनीकरण झाले होते, तर त्याचे अधिकृत आदेश कुठे आहेत? आणि नूतनीकरण झालेच नव्हते, तर संबंधित दुकानदारांना धान्य वितरण करण्याची मंजुरी कोणत्या अधिकाराने देण्यात आली? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, तक्रारदाराने माहिती अधिकारातून मिळविलेल्या नोंदींमध्ये परवाना नूतनीकरणाचे शिक्के आणि नोंदी आढळून येत असताना आवश्यक स्वाक्षऱ्या नसल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून स्वाक्षऱ्या नजरचुकीने राहिल्याचे लेखी स्पष्टीकरण देण्यात आले. हे स्पष्टीकरण स्वतः जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या सहीने देण्यात आले असल्याने आता या प्रकरणात त्यांची प्रशासकीय जबाबदारी टाळता येणार आहे का? नोंदवहीतील स्वाक्षरी ही केवळ किरकोळ बाब आहे की परवाना नूतनीकरणाच्या अधिकृत प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे? जर स्वाक्षरी राहिली असेल, तर त्यासाठी जबाबदार कोण? आणि ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली?

याहून गंभीर संशय निर्माण करणारी बाब म्हणजे, तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणात अडचण निर्माण होऊ नये म्हणून पूर्वीच नूतनीकरण झालेल्या परवान्यांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि केवळ नोंदवहीमध्ये स्वाक्षरी राहिल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का? असा सवाल उपस्थित होत आहे. जर संबंधित दुकानांचे परवाने आधीच नूतनीकरण झाले होते, तर त्या नूतनीकरणाच्या वेळी तयार झालेले मूळ आदेश, परवान्यांवरील स्वाक्षरीची तारीख, नोंदवहीतील नोंदी आणि प्रत्यक्ष परवाना दुकानदारांना दिल्याच्या तारखा प्रशासनाने जाहीर का करू नयेत? तक्रारीपूर्वी आणि तक्रारीनंतरच्या कागदपत्रांची तुलना केली असता वस्तुस्थिती स्पष्ट होणार नाही का? त्यामुळे केवळ नजरचुकीने सही राहिली, असे सांगून संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी संपविण्याचा प्रयत्न होत आहे का, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे, एखाद्या रास्तभाव धान्य दुकानाचा परवाना नूतनीकरण झालेला नसेल, तर त्या दुकानाला सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्य वितरण करण्याची मंजुरी कोणत्या वैध आधारावर देण्यात आली? नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण नसताना धान्य वितरण सुरू ठेवण्यात आले असेल, तर त्याची प्रशासकीय जबाबदारी कोणाची? आणि नूतनीकरण झाले होते असे प्रशासनाचे म्हणणे असेल, तर मग नोंदवहीतील स्वाक्षऱ्या राहिल्याचे स्पष्टीकरण देण्याची वेळच का आली? या प्रश्नांची उत्तरे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केवळ पत्रव्यवहारातून नव्हे, तर मूळ शासकीय अभिलेखांसह द्यावीत.

तक्रारदार गणेश तुकाराम पवार यांनी या प्रकरणी यापूर्वीही लेखी तक्रारी केल्या असून, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंत्रालयातील अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव, उपसचिव, पुणे विभागीय आयुक्त, उपायुक्त पुरवठा आणि सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा तक्रार सादर केली आहे. मात्र, संबंधित प्रकरणात ज्यांच्या कार्यकाळातील परवाना नूतनीकरणाच्या नोंदींबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याच जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात येत असेल, तर या स्पष्टीकरणाची स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पडताळणी होणे आवश्यक नाही का? स्वतःच्या कार्यालयातील त्रुटींवर स्वतःच खुलासा देऊन प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न होत आहे का? या बाबींची निष्पक्ष तपासणी झाली पाहिजे.

एकीकडे रास्तभाव दुकानदारांच्या परवाना नूतनीकरणासाठी नियम आणि अटींचे पालन अपेक्षित असताना, दुसरीकडे शासकीय नोंदवहीतील स्वाक्षऱ्या नजरचुकीने राहिल्याचे स्पष्टीकरण देऊन प्रकरण संपविण्याची भूमिका घेतली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी प्रशासनाच्या पारदर्शकतेवर विश्वास कसा ठेवायचा? वैशाली राजमाने यांनी स्वतःच्या स्वाक्षरीने दिलेल्या पत्रातील खुलाशाची सत्यता मूळ अभिलेखांच्या आधारे सिद्ध करावी. अन्यथा, तक्रारदाराने उपस्थित केलेले प्रश्न अधिक गंभीर बनतील. १८ रास्तभाव दुकानांच्या परवाना नूतनीकरण प्रकरणात नेमके काय घडले, तक्रारीनंतर कागदपत्रांमध्ये काही बदल झाले का आणि धान्य वितरणाची मंजुरी कोणत्या वैध आदेशाच्या आधारे देण्यात आली, याचा निर्णय आता वरिष्ठ प्रशासनाने घ्यायचा आहे. नजरचुकीने सह्या राहिल्या की तक्रारीनंतर त्रुटी झाकण्यासाठी खुलाशाचा आधार घेतला जात आहे? या प्रश्नाचे उत्तर पारदर्शक चौकशीतूनच समोर आले पाहिजे!

पुढील 3.30 भागामध्ये – जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी शासकीय धान्य दुकाने व शासकीय धान्य गोदामे तपासली होती का

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close