वैशाली राजमाने यांच्या आशीर्वादाने कराड पुरवठा विभागात अनियमिततांचा स्फोट? शंभरावर कार्डांना धान्य मंजुरी, काही दुकानांत शून्य वाढ, टाळी क्रमांक ९६ मधील हजेरी-वेतन विसंगती, दुकानांचे तपासणी अहवाल गायब? भारतकुमार तुंबडे यांचे दैनंदिन व हालचाल रजिस्टर कार्यालयात उपलब्ध नाही?, मग जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांचे नियंत्रण नेमके कुठे?
विश्व सिटी न्यूज विशेष वृत्तमालिका भाग - १४२ वा

कराड : कराड तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य मंजुरी, लाभार्थी कार्डांची वाढ, शासकीय धान्य गोदामातील कामकाज आणि अधिकाऱ्यांच्या तपासणी व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या कार्यकाळातील कथित अनियमितता आणि पर्यवेक्षणातील त्रुटींबाबत गणेश तुकाराम पवार यांनी १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मंत्रालयासह विभागीय आयुक्त, उपायुक्त पुरवठा पुणे आणि जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीतील सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे कराड तालुक्यातील रास्तभाव धान्य दुकानांमध्ये लाभार्थी कार्डांची वाढ आणि धान्य मंजुरीमध्ये दिसणारी मोठी तफावत. काही दुकानांमध्ये शंभरपेक्षा अधिक लाभार्थी कार्डांना धान्य वाटपासाठी मंजुरी मिळाल्याचे चित्र असताना काही दुकानांमध्ये एकाही कार्डाची वाढ झालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. एकाच तालुक्यात, एकाच सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अशा प्रकारची मोठी तफावत कशी निर्माण झाली? लाभार्थ्यांची संख्या, पात्रता आणि धान्य मंजुरीचे निकष सर्व दुकानांसाठी समान असताना एवढी विसंगती का? या संपूर्ण प्रक्रियेवर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून वैशाली राजमाने यांचे नियंत्रण होते की नाही?
एका दुकानामध्ये शंभरच्या वर लाभार्थी कार्डांना धान्य मंजुरी मिळत असताना दुसऱ्या दुकानांमध्ये एकाही कार्डाची वाढ न होण्यामागील नेमके कारण काय? संबंधित दुकानांतील लाभार्थ्यांची प्रत्यक्ष संख्या, पात्र कुटुंबांची कागदपत्रे, रेशनकार्ड व्यवस्थापन प्रणालीतील नोंदी, मंजुरी आदेश आणि धान्य वितरणाची आकडेवारी यांची तुलनात्मक तपासणी झाली होती का? एखाद्या दुकानात मोठ्या प्रमाणात कार्डांची वाढ होत असताना दुसऱ्या दुकानात एकही वाढ होत नसेल तर ही बाब जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येणे अपेक्षित नव्हते का? की एवढ्या मोठ्या तफावतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले? लाभार्थ्यांच्या पात्रतेची तपासणी न करता मंजुरी देण्यात आली का, तसेच पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपासून वंचित ठेवण्यात आले का, याची दुकाननिहाय चौकशी होणे आवश्यक आहे.
याचबरोबर कराड शासकीय धान्य गोदामातील टाळी क्रमांक ९६ अंतर्गत काम करणारे कर्मचारी सुनील विठ्ठल पागडे यांच्या हजेरी आणि वेतनपत्रकातील कथित विसंगतीचाही गंभीर मुद्दा तक्रारीत उपस्थित करण्यात आला आहे. दैनंदिन हजेरी पुस्तकात अनुपस्थितीची नोंद असताना वेतनासाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये उपस्थिती दाखविण्यात आल्याचा आरोप आहे. हजेरीतील नोंद बदलून उपस्थिती दाखविण्यात आली का? प्रत्यक्ष कामावर नसताना वेतन अदा झाले का? वेतनपत्रकाची पडताळणी कोणी केली? गोदामाची तपासणी करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत ही बाब का आली नाही? जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी गोदामातील मूळ हजेरी पुस्तके आणि वेतनपत्रकांची तपासणी केली होती का? या बाबींची मूळ कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांच्या कार्यालयातील दैनंदिन कामकाज रजिस्टर आणि हालचाल रजिस्टर उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त अधिकृत उत्तरात स्पष्ट झाल्याचा मुद्दाही तक्रारीत मांडण्यात आला आहे. मग अधीनस्थ अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय भेटी, गोदाम तपासण्या, दुकान तपासण्या आणि दैनंदिन कामकाजावर नियंत्रण कसे ठेवले जात होते? कार्यालयीन हालचालींची नोंदच उपलब्ध नसेल तर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कोणती कामे केली, हे कसे पडताळणार? या रजिस्टरची उपलब्धता तपासण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नव्हती का? भारतकुमार तुंबडे यांच्या कार्यालयातील अभिलेखांच्या अनुपलब्धतेबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी काय कार्यवाही केली, याचाही खुलासा होणे आवश्यक आहे.
या संपूर्ण प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांची भूमिका केवळ संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यापुरती मर्यादित होती का? की त्यांनी स्वतः प्रत्यक्ष तपासणी करून धान्य मंजुरी, लाभार्थी वाढ, गोदामातील हजेरी, वेतनपत्रके आणि कार्यालयीन रजिस्टर यांची पडताळणी केली होती? शासकीय धान्य गोदाम आणि रास्तभाव धान्य दुकानांच्या तपासणीसंदर्भातील शासन परिपत्रकांनुसार नियमित तपासणी व पर्यवेक्षण झाले होते का? तपासणी झाली असेल तर त्याचे अहवाल आणि नोंदी कुठे आहेत? आणि तपासणी झाली नसेल तर जबाबदारी कोणाची? या प्रश्नांची उत्तरे केवळ कागदोपत्री खुलाशातून मिळणार नाहीत, तर मूळ अभिलेखांची स्वतंत्र पडताळणी करणे गरजेचे आहे.
तक्रारदार गणेश पवार यांनी या प्रकरणात सर्व रास्तभाव धान्य दुकानांची दुकाननिहाय लाभार्थी संख्या, कार्डवाढीचे प्रस्ताव, मंजूर कार्डांची संख्या, धान्य वाटपासाठी मंजूर झालेली कुटुंबे, मंजुरी आदेश, RCMS प्रणालीतील बदल आणि प्रत्यक्ष धान्य वितरणाची तुलनात्मक तपासणी करण्याची मागणी केली आहे. शंभरपेक्षा अधिक कार्डांना मंजुरी मिळालेल्या दुकानांची आणि एकाही कार्डाची वाढ न झालेल्या दुकानांची स्वतंत्रपणे तपासणी करावी. त्याचबरोबर दुकानांचे अनुपलब्ध तपासणी अहवाल, टाळी क्रमांक ९६ मधील हजेरी-वेतन विसंगती आणि भारतकुमार तुंबडे यांच्या कार्यालयातील रजिस्टर अनुपलब्धतेची जबाबदारी निश्चित करावी. दोष आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनासह कठोर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
१६ नोव्हेंबर २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता या तक्रारीने सातारा जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका दुकानात शंभरावर कार्डांना धान्य मंजुरी आणि दुसऱ्या दुकानात एकाही कार्डाची वाढ नाही, ही तफावत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिसली नाही की दिसूनही त्यावर कारवाई झाली नाही? लाभार्थ्यांच्या धान्य मंजुरीचा एवढा महत्त्वाचा विषय असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमके कोणते पर्यवेक्षण केले? शासकीय धान्य गोदामातील हजेरी आणि वेतनातील विसंगतीची जबाबदारी कोण घेणार? वैशाली राजमाने यांच्या कार्यकाळातील या सर्व बाबींची स्वतंत्र चौकशी होऊन जबाबदारी निश्चित होणार की पुन्हा कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलून वरिष्ठ अधिकारी नामानिराळे राहणार? आता मंत्रालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय यावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
पुढील भागात – सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने



