साहीला नायकवडे प्रकरणाचा स्वयं स्पष्ट अहवाल अखेर मंत्रालयात दाखल! निलंबन, शिस्तभंग, फौजदारी गुन्हा आणि शासनाच्या नुकसानीच्या वसुलीवर नेमके काय लिहिले? आता जिल्हाधिकारी ते मंत्रालयापर्यंत प्रत्येक टेबलचा हिशेब मागवणार; दीड महिना फाईल कोणी अडवली, किती दिवस अडवली? अहवालातील सत्य तपासूनच पुढील निर्णय; वेळ पडल्यास न्यायालयात याचिका दाखल करून अधिकाऱ्यांना कायदेशीर आव्हान!
विश्व सिटी न्यूज विशेष वृत्तमालिका भाग - १४२ वा

कराड : कराड पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती साहीला शब्बीर नायकवडे यांच्या कार्यकाळातील कथित अनियमितता आणि चुकीच्या कामकाजाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने आता मंत्रालयीन स्तरावर निर्णायक वळण घेतले आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून तक्रारदार तथा आंदोलक गणेश तुकाराम पवार यांचा लढा सुरू असून, कराड येथे जवळपास तीन महिने आंदोलन केल्यानंतर आता मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. या प्रकरणात मंत्रालयाने जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडून स्वयं स्पष्ट अहवाल मागविला होता. त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन, शिस्तभंगाची कारवाई, फौजदारी गुन्हा दाखल करणे आणि शासनाचे झालेले आर्थिक नुकसान वसूल करणे या चार महत्त्वाच्या मागण्यांवर स्पष्ट भूमिका मांडण्याचे निर्देश होते. आता जिल्हाधिकारी सातारा यांनी अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तो मंत्रालयात पाठविण्यात आला आहे. मात्र, अहवाल दाखल झाला म्हणजे कारवाई झाली असे नाही! या अहवालात नेमके काय नमूद केले आहे, कोणत्या मागणीला मान्यता दिली आहे आणि कोणत्या मागणीवर मौन बाळगले आहे, हे समोर आल्याशिवाय प्रशासनाच्या भूमिकेवर विश्वास कसा ठेवायचा?
आता या अहवालाच्या प्रत्येक शब्दाची तपासणी केली जाणार आहे. निलंबनाबाबत काय शिफारस आहे? शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत कोणता अभिप्राय दिला आहे? फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर काय नमूद केले आहे? शासनाच्या आर्थिक नुकसानीची वसुली करण्याबाबत कोणती भूमिका घेतली आहे? तक्रारदाराने केलेल्या मूळ तक्रारींचा अहवालात समावेश आहे की महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवण्यात आले आहेत? या सर्व बाबींची माहिती मिळाल्यानंतरच पुढील आंदोलनात्मक आणि कायदेशीर निर्णय घेतले जाणार आहेत. केवळ अहवाल मंत्रालयात पोहोचवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाला आहे का, हेही तपासले जाणार आहे.
सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा अहवाल तयार होऊन मंत्रालयात दाखल होण्यासाठी तब्बल दीड महिन्याचा कालावधी का लागला? जिल्हाधिकारी सातारा यांनी अहवाल तयार करण्यासाठी नेमके किती दिवस घेतले? जिल्हाधिकारी कार्यालयात फाईल कोणत्या टेबलावर किती दिवस पडून होती? त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात अहवाल किती दिवस ठेवण्यात आला? कोणत्या अधिकाऱ्याच्या टेबलावर फाईल किती दिवस अडकली होती? अहवालामध्ये काही बदल किंवा दुरुस्त्या करण्यात आल्या का? विभागीय आयुक्तांनी मंत्रालयाकडे अहवाल नेमक्या कोणत्या तारखेला पाठविला? या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता कागदोपत्री मागितले जाणार आहे. फाईलचा प्रवास लपविण्याचा प्रयत्न झाला तर तोही माहिती अधिकार आणि रीतसर अर्जांच्या माध्यमातून उघड केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आणि विभागीय आयुक्त कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत फाईलच्या प्रत्येक टप्प्याची तारीख, संबंधित टेबल, जबाबदार अधिकारी आणि प्रलंबित राहण्याचा कालावधी यांची सविस्तर माहिती मागविण्यात येणार आहे. फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर जाण्यासाठी इतका वेळ का लागला? कोणत्या अधिकाऱ्याने कोणती कार्यवाही केली? विलंबाचे कारण काय? मंत्रालयाच्या आदेशानंतरही अहवाल वेळेत सादर का झाला नाही? प्रशासकीय विलंबाची जबाबदारी नेमकी कोणाची? आता केवळ तोंडी स्पष्टीकरण चालणार नाही, तर प्रत्येक विलंबाचे लेखी कारण मागितले जाणार आहे.
तसेच मंत्रालयात अहवाल दाखल झाल्यानंतर त्यावर किती दिवसांत कार्यवाही झाली, कोणत्या अधिकाऱ्याने अहवाल तपासला, कोणती टिपणी केली आणि निलंबन, शिस्तभंग, फौजदारी कारवाई व आर्थिक वसुलीबाबत काय निर्णय घेतला, याचीही माहिती मागविली जाणार आहे. अहवालात कारवाईची शिफारस असेल तर आदेश कधी निघणार? कारवाईची शिफारस नसेल तर त्यामागील कारणे काय? तक्रारींमधील गंभीर मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका न घेता अहवाल सादर केला असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? मंत्रालयाने आता या प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देणे आवश्यक आहे.
मंत्रालयात अहवाल दाखल झालेला आहे. जिल्हाधिकारी सातारा आणि विभागीय आयुक्त यांच्यामार्फत सादर करण्यात आलेल्या स्वयं स्पष्ट अहवालाच्या आधारेच पुढील कारवाई केली जाणार आहे की, अहवालाची स्वतंत्रपणे सखोल तपासणी केल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही त्रुटी, विसंगती किंवा महत्त्वाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आल्यास मंत्रालयातील सक्षम अधिकारी आपल्या प्रशासकीय व वैधानिक अधिकारांचा वापर करून स्वतःहून योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेणार आहेत? जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी पाठविलेला अहवाल हाच अंतिम आधार मानला जाणार की मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी स्वतंत्र विचार करून निलंबन, शिस्तभंगाची कारवाई, फौजदारी गुन्हा आणि शासनाच्या आर्थिक नुकसानीची वसुली याबाबत ठोस निर्णय घेणार आहेत? अहवालातील त्रुटींच्या आडून कारवाई टाळली जाणार की सक्षम अधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार? कोणत्या अधिकाऱ्याने अहवाल तपासला, त्यावर काय टिपणी केली आणि अंतिम निर्णय काय घेतला, याचीही संपूर्ण माहिती मागविली जाणार आहे. कारण जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी अहवाल पाठविला म्हणजे मंत्रालयाची जबाबदारी संपत नाही! अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या मंत्रालयातील सक्षम अधिकाऱ्यांनी स्वतःच्या प्रशासकीय अधिकारांचा वापर करून योग्य ती कारवाई करणार की पुन्हा अहवालाच्या नावाखाली निलंबनाची कारवाई दडपली जाणार का, हा आता सर्वांत महत्त्वाचा प्रश्न आहे.
आंदोलकांची भूमिका स्पष्ट आहे. स्वयं स्पष्ट अहवालात तक्रारदाराने मागणी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यांचा समावेश नसेल, महत्त्वाच्या तक्रारी वगळल्या असतील किंवा अहवालातील निष्कर्षांच्या आधारे कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसेल, तर संबंधित अहवालाची प्रत आणि संपूर्ण प्रशासकीय कागदपत्रे मागवून जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात स्वतंत्र तक्रार अर्ज दाखल केले जाणार आहेत. वेळ पडल्यास संबंधित प्रशासकीय निर्णयांना न्यायालयात याचिका दाखल करून आव्हान दिले जाणार आहे. कोणत्या अधिकाऱ्याने कोणती जबाबदारी पार पाडली नाही, याची कायदेशीर पातळीवर दखल घेण्याची मागणीही केली जाणार आहे.
तक्रारदार तथा आंदोलक गणेश तुकाराम पवार यांनी स्पष्ट केले आहे की, अहवाल सादर झाला आहे म्हणून आंदोलन संपलेले नाही. प्रथम अहवालामध्ये नेमके काय नमूद करण्यात आले आहे, कोणत्या मागण्यांवर काय अभिप्राय दिला आहे आणि मंत्रालयाने त्यावर काय निर्णय घेतला आहे, हे तपासले जाणार आहे. त्यानंतरच पुढील भूमिका निश्चित केली जाईल. अहवालात मागण्या डावलल्या गेल्या असतील किंवा कारवाई टाळण्याचा प्रयत्न झाल्याचे कागदपत्रांतून स्पष्ट झाले, तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात स्वतंत्र तक्रारी, न्यायालयीन लढा आणि अधिक तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल. साडेचार महिन्यांचा संघर्ष केवळ एका अहवालापुरता मर्यादित राहणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
आता प्रशासनासमोर सरळ प्रश्न उभा आहे. मंत्रालयाचा आदेश असताना तसेच या अनुषंगाने आंदोलन सुरू असताना अहवालासाठी दीड महिना का लागला? फाईल कोणत्या टेबलावर किती दिवस अडकली होती? निलंबन, फौजदारी गुन्हा आणि शासनाच्या नुकसानीच्या वसुलीबाबत अहवालात नेमके काय नमूद आहे? मंत्रालय प्रत्यक्ष कारवाई करणार की पुन्हा फाईलवरच निर्णय प्रलंबित ठेवणार? या संपूर्ण प्रक्रियेचा हिशेब आता मागितला जाणार असून, अहवालातील सत्य समोर आल्यानंतरच पुढील आंदोलन आणि न्यायालयीन कारवाईची दिशा ठरणार आहे. आझाद मैदानावरील आंदोलनातून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरूच राहणार असून, आता प्रत्येक टेबलवरील फाईलचा हिशेब आणि प्रत्येक निर्णयाची जबाबदारी निश्चित करण्याची लढाई सुरू झाली आहे.
पुढील भागात – सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने



