एकनाथ शिंदेंना विरोध भोवला, भाजपने घेतली पहिली ‘विकेट’, माजी आमदार ६ वर्षांसाठी ‘आऊट’

मुंबई : रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. सेनेत प्रवेश केल्याबरोबर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
मात्र त्यांच्या प्रवेशाला आणि उमेदवारीला स्थानिक माजी आमदाराने विरोध करत त्यांचे काम करणार नसल्याच्या पवित्रा घेतला. त्यामुळे भाजपने थेट माजी आमदाराची विकेट घेतली.
महायुतीत रामटेक विधानसभेची जागा कोण लढेल यावरून खल सुरू आहे. अशात आशिष जयस्वाल यांच्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने भाजपच्या इच्छुकांना धक्का बसल्याचे बोलले जाते.
एका बाजूला महायुतीमध्ये जागा वाटपाचा निर्णय अद्याप जाहीर झाला नसताना दुसरीकडे उमेदवार जाहीर करण्यात आल्याने माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी जयस्वाल यांच्याविरोधात मोर्चा उघडला. आम्ही जयस्वाल यांचे काम करणार नाही. त्यांची उमेदवारी आम्हाला मान्य नसल्याचे सांगत शिंदे मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही काम करत नाही, असा पवित्रा रेड्डी यांनी घेतला होता. त्यामुळे पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत रेड्डींचे भाजपमधून 6 वर्षासाठी निलंबन करण्यात आलेले आहे.
आशिष जयस्वाल हे 2019 मध्ये रामटेकमधून अपक्ष म्हणून निवडून आले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही अपक्ष आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यात आशिष जयस्वाल यांचाही समावेश होता. आशिष जयस्वाल यांनी विधानसभेआधी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. १३ ऑक्टोबर रोजी त्यांचा पक्षप्रवेशही संपन्न झाला.
रामटेकच्या जागेवर भाजपकडून दावा सांगण्यात येत होता. मात्र आशिष जैयस्वाल यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने रामटेकमधून तेच लढणार असल्याचे जवळपास ठरले आहे, असे बोलले जाते. त्यामुळे भाजपमधून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या काळातील बंडखोरी थांबविण्यासाठी भाजप काय उपाय करणार, हे पाहावे लागेल.