
कराड : मागील काही महिन्यापासून तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कोतवालांना त्यांच्या सजातील काम सोडून तहसील कार्यालयातील कामकाज पाहण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी शीतल माने यांनी बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी परिपत्रक काढले असून कोतवालांच्या सेवा वरिष्ठ कार्यालयास संलग्नित न करता संबंधित त्या त्या सजा कार्यालयास त्वरीत वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
कराड तहसील कार्यालयात सुद्धा नवीन अधिकारी यांनी सुद्धा हाच पायंडा पाडला होता. कराड तालुक्यातील 22 कोतवालांना त्यांच्या सज्यातील कामकाज सोडून तहसील कार्यालयातील कामकाज करण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याचा भार त्या गावातील तलाठ्यांवर पडल्याने अनेक ग्रामस्थांची कामे खोळंबली होती. त्यावेळी कराड तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया कराड तालुक्यातून उमटल्या होत्या. याबाबत साप्ताहिक विश्व सिटी न्यूजने आवाज उठवला होता. व त्याची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे.
कराड तालुका हा सातारा जिल्ह्यामधील दोन मतदारसंघाचा तालुका आहे. यामुळे तालुक्यामध्ये काम हे त्याचपटीने आहे. परंतु सध्या झालेल्या तलाठ्यांच्या बदल्या यामध्ये जेवढे तलाठी कराड मधून बाहेरच्या तालुक्यामध्ये बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्या पटीमध्ये तालुक्यामध्ये दुसरे तलाठी आलेले नाहीत. तसेच कित्येक अण्णासाहेबांच्या कडे दोन-तीन गावांचा कारभार बघावा लागत आहे. हे काम करत असताना शासनाने काढलेल्या अनेक योजनांच्या कागदपत्रासाठी तलाठी कार्यालयामध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळत होती. त्यावेळेस अण्णा साहेबांना कसरतच करावी लागत होती. एका व्यक्तीने दोन-तीन गावांचा कारभार सांभाळायचा म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे. परंतु, त्यांच्या हाताखाली असणारे कोतवालांमुळे दोन-तीन गावच्या कारभाराचे काम अण्णासाहेब व्यवस्थित पार पाडत होते.
कराड तालुक्यातील साधारण 22 कोतवालांची तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्यासाठी दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी आदेश काढून नेमणुका करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता या आदेशाला महसूल व वन विभाग निर्णय क्र. पीकेए1059/4/एल. दि. 07/05/1959 अन्वये विहित करण्यात आल्यानुसार कोतवालांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सद्यस्थितीत कोतवाल संवर्गाच्या बाबतीत एका साझास एक कोतवाल असे धोरण निश्चित करण्यात आले आहे. परंतु कोतवालांच्या सेवा संबंधित तलाठी सजा कार्यालय सोडून अन्य महसूली कार्यालयास संलग्न करण्यात येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात अथवा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा अन्य महसुली कार्यालयात कोतवालांच्या सेवा संलग्न केल्या असल्यास, सदर कोतवालांच्या सेवा संबंधित त्या-त्या तलाठी सजा कार्यालयास त्वरीत संलग्न करण्याबाबत संबंधिताना सूचना देण्यात याव्यात. तसेच त्यानुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास त्वरीत सादर करण्यात यावा असे परिपत्रक सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी शीतल माने यांनी काढले आहे.