गुंड विठ्ठल शेलारची बुलेटप्रूफ व्हाईट स्कॉर्पिओ जप्त
पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या गुंड विठ्ठल शेलारची पुणे पोलिसांनी बुलेटप्रूफ व्हाईट स्कॉर्पिओ जप्त केली.
विशेष म्हणजे, ही कार पुनावळे येथील एका फार्महाऊसवर होती. मात्र, पोलीस ती जप्त करतील या भितीने ती कार दुसरीकडे घेऊन जात असताना गुन्हे शाखेने गाडीचा माग काढला. पोलीस मागावर असल्याचे समजताच बुलेटप्रूफ कार रस्त्याच्या कडेला सोडून त्यांनी पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी ती जप्त केली. दरम्यान, शरद मोहोळ खूनप्रकरणात गुन्हे शाखेने आत्तापर्यंत महागड्या ६ कार जप्त केल्या आहेत.
गँगस्टर शरद मोहोळ याचा (दि. ५ जानेवारी) रोजी भरदुपारी गोळ्या झाडून घरासमोरच खून करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने प्रथम दोन वकिलांसह ८ जणांना अटक केली. गोळ्या झाडणाऱ्या तिघासोबत इतर आरोपी पळून जाताना त्यांना पकडले होते. त्यांच्याकडे तपासातून गुन्ह्याचे मास्टर माईंड गुंड विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे असल्याचे समोर आले. लागलीच पोलिसांनी विठ्ठल शेलारच्या मुसक्या आवळल्या. तर गणेश मारणे फरार असून, त्याचा शोध घेत आहेत. त्याचा ठाव ठिकाणी लागलेला नाही. तत्पूर्वी पुणे पोलिसांकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या गाड्या व इतर गोष्टी जप्त करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पोलिसांनी आतापर्यंत क्रेटा, इंनोव्हा, फॉर्च्युनरसह महागड्या एकूण ६ कार जप्त केल्या आहेत. दरम्यान पोलीस गाड्या जप्त करत असताना विठ्ठल शेलारची एक क्रेटा जप्त केली. तेव्हा त्याच्याकडे एक बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ असल्याची माहिती मिळाली. परंतु, त्यापूर्वीच पोलीस ही बुलेटप्रूफ जप्त करतील, या भितीने पोलीस पोहचण्यापूर्वी ती पुनावळे येथून दुसरीकडे हलवण्यात आली. मात्र पोलिसांना याची काही वेळातच माहिती मिळाली व पोलिसांनी तिचा पाठलाग सुरू केला. वाकड भागात ही कार आली असतानाच या कार घेऊन जाणाऱ्याना पोलीस मागावर असल्याचीही माहिती मिळाली. त्यांनी लागलीच कार रस्त्याच्या बाजूला सोडत पळ काढला.
दरम्यान पोलिसांनी ही बुलेटप्रूफ कार पकडत ती जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. विठ्ठल शेलार बुलेटप्रूफ कार वापरत असल्याने याची चांगली चर्चा सुरू आहे. मात्र पोलिसांकडून आता ही मोठ्या प्रकरणात कारवाई सुरू केली असून, कसून तपास घेतला जात आहे. दरम्यान आता पोलीस ती कार कोण घेऊन जात होते, याचा तपास करत आहेत.