
कराड : कराड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आत्तापर्यंत अनेक वेळा सावळा गोंधळ पहावयास मिळाला आहे त्यातच बरीच भर म्हणून की काय कापिल गावातील हौदमळा ते कटपानमळा या भागात पाईप गटरसाठी 27 लाख 70 हजार रुपये खर्च करण्यात आले मात्र ते काम योग्य पद्धतीने झाले का याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी खात्री करायला हवी होती. या पाईप गटाच्या झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याबाबत ग्रामस्थातून तीव्र संताप व्यक्त होत आहे याबाबत वरिष्ठांनी योग्य ती दखल घेऊन झालेल्या कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.
रा. मा. 148 रेठरे खुर्द अटके पाचवड कटपानमळा गोळेश्वर कापील गोळेश्वर कर्वे नाका या मार्गावरील प्र. जि. मा. 81 कटपानमळा ते गोळेश्वर रस्त्याच्या सुधारणा कामास 3 कोटी 50 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर संबंधित काम पूर्ण झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सक्षम व्हावे, वाहतुकीला गती मिळावी आणि परिसराच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला होता.
या कामांतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण तसेच आवश्यक त्या ठिकाणी पूरक सुविधा उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. विशेषतः कापिल गावातील हौदमळा ते कटपानमळा या भागात पाईप गटरसाठी 27 लाख 70 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीच्या आधारे संबंधित काम पूर्ण झाल्याचे नोंदीत दाखविण्यात आले आहे.
मात्र स्थानिक नागरिकांमध्ये पाईपलाईनबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. प्रत्यक्ष पाहणी करताना पाईपलाईन नेमकी कुठे आणि कशा प्रकारे करण्यात आली आहे, हे स्पष्टपणे समजून येत नाही, अशी चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी कामाचे स्वरूप आणि नियोजन यामध्ये तफावत जाणवत असल्याचे नागरिक सांगत आहेत.
या संपूर्ण कामकाजात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी झाल्याचा आरोप होत आहे. तांत्रिक बाबींची काटेकोर तपासणी झाली का, कामाच्या दर्जाबाबत योग्य देखरेख ठेवली गेली का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोठा निधी खर्च होऊनही पारदर्शकतेचा अभाव असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
रस्ता सुधारणा प्रकल्प हा विकासाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात असला तरी संबंधित कामातील बाबींवर सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी पुढे येत आहे. निधीचा योग्य वापर झाला का आणि काम अपेक्षित दर्जानुसार झाले का, याची वस्तुनिष्ठ पडताळणी व्हावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
पुढील भागात – दोषी अधिकारी व ठेकेदारावरती कारवाई होणार ..?



