
कराड ः कराड शहरालगत मुंढे येथे घुसखोरी मार्गाने प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी नागरिकांसह त्यांना वास्तव्य देणाऱ्या मुंढे येथील एकास रविवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून चौघांची कसून तपासणी सुरू असून त्यांनी कशाप्रकारे मुंबई आणि मुंबईतून कराड प्रवास केला याबाबतही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
बिलाल सलाल उद्दीन मोल्ला, आयेशा अदिल शेख, नसरिन अब्दुलसालाय मोल्ला (सर्वजण मूळ रा. बांगलादेश) व करण बापू कांबळे (वय 29, सध्या रा. मुंढे, ता. कराड, मूळ रा. किवळ, ता. कराड) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून कराडलगतच्या मुंढे गावात राहणाऱ्या तिघा बांगलोदशी नागरिकांसह त्यांना वास्तव्य देणाऱ्या मुंढे येथील एकास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्यांना रविवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी चौघांकडे तपासाची गती वाढवत त्यांच्याकडे काय काय कागदपत्रे उपलब्ध आहेत त्याची तपासणी सुरू आहे. तसेच त्यांनी आधारकार्ड कोणाकडे बनवून घेतली. त्याशिवाय आणखी काही कागदपत्रे इथे त्यांनी बनवली आहेत का याचीही आम्ही खात्री करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



