
कराड : उंब्रज मंडल अधिकारी हे गौण खनिजाच्या बाबतीत त्यांना हव्या असलेल्या गोष्टीप्रमाणे वागत आहेत असा प्रत्यय खूप वेळा आल्याचे दिसून आले आहे. कारण गौण खनिज मधील मुरूम टाकलेल्या जागेचे मंडल अधिकारी उंब्रज यांनी पंचनामे करून तसा अहवाल तहसील कार्यालयात पाठवून त्या जमीन मालकास दंडाची नोटीस ही देण्यात आली आहे. परंतु, वीटभट्टीसाठी लागणाऱ्या लाल मातीच्या वाहतुकी बाबत ट्रॅक्टरची ट्रॉली सपाट भरल्यास ती पावन ब्रास ते एक ब्रास भरलेली असते. परंतु ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये लाल मातीचा सिग लावून माती वाहतूक केली जाते. त्यामध्ये साधारण दीड ते पावणेदोन ब्रास लाल मातीची वाहतूक केली जाते. परंतु याबाबत मंडल अधिकारी उंब्रज यांनी कोणतीच कारवाई अथवा पंचनामा केल्याचे दिसून येत नाही.
तसेच जे वीट भट्टी धारक ज्या जमिनीतून वीट भट्टी साठी लागणारी लाल माती उचलणार आहेत त्या ठिकाणचे पंचनामा तलाठी व मंडलाधिकारी यांनी करण्याची आवश्यकता असते. कारण ज्या ठिकाणावरून वीट भट्टी व्यवसाय करणारे 200 ब्रास लाल माती उचलणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी किती ब्रास माती उचललेली आहे हे पंचनामा करताना लक्षात येण्यासाठी त्या ठिकाणी पूर्वी उत्खनन झालेले आहे किंवा नाही. तसेच ती जमीन कोणत्या ठिकाणी आहे याचीही कल्पना येण्यासाठी पंचनामा करणे आवश्यक आहे. तसेच ज्या ठिकाणावरून लाल माती उचलणार आहेत त्यासाठी शासनाने दिलेल्या खोली एवढीच खुदाई त्या व्यवसाय धारकांच्या कडून केली आहे का हे पाहण्याची आवश्यकता असते. म्हणून लाल माती उत्खनन करण्या आधी व उत्खनन झाल्या नंतर ज्या ठिकाणावरून मातीचे उत्खनन केलेले आहे त्या ठिकाणचे पंचनामा तलाठी व मंडल अधिकारी यांनी करण्याचे असतानाही उंब्रज मंडल अधिकारी यांनी असे पंचनामे केलेले नाहीत.
तसेच वीट भट्टी धारकांनी वीट भट्टी व्यवसायासाठी किती ब्रास लाल मातीचे चलन भरलेले आहे. त्या प्रमाणातच त्यांनी लाल माती उचलली आहे का हे पाहणे गरजेचे आहे. कारण वीटभट्टीसाठी त्यांनी किती लाल माती आणली त्यापासून किती विटा तयार केल्या व त्या वीटभट्टीच्या ठिकाणी किती लाल मातीचा साठा शिल्लक आहे हे पंचनामा करून पाहिल्याशिवाय काहीच समजणार नाही. परंतु वीटभट्टी धारकांनी व्यवसायासाठी लागणारी लाल माती उचलली असून त्यापासून विटाही बनवलेल्या आहेत. तसेच वीरभट्टीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा साठा शिल्लक आहे. परंतु मंडलाधिकारी यांनी त्या ठिकाणचे पंचनामे केलेले नाहीत.
तरी मंडल अधिकारी उंब्रज यांनी कोणत्या कारणाने व कोणाच्या आदेशाने हे पंचनामे केलेले नाहीत तसेच ज्यादा उत्खनन केलेले आहे. त्या वीट भट्टी धारकांच्या वरती कारवाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात का पाठवले नाहीत. याबाबत वरिष्ठ कार्यालयात लवकरच तक्रार दाखल होणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्याकडून बोलले जात आहे.
क्रमश:
पुढील भागात मंडल अधिकारी उंब्रज यांच्यावरती वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने त्यांनी टाकलेला कोणताही शब्द काही अधिकारी पाडत नसल्याचे दिसत आहे.