पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा हादरा, बड्या नेत्याचा आमदार पुत्र तुतारी हाती घेणार, भाजपला मोठा धक्का, राजीनामा पाठवला

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील निर्भेळ यशानंतर शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. कागलमध्ये समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर बारामतीच्या शेजारील इंदापुरमध्येही हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला दणका देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला.
दोन नेत्यांच्या पक्षप्रवेशाला आठवडा उलटत नाही तोच बारामतीशेजारील फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आणि अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण यांनीही तुतारी फुंकली. आता माढ्यातही पक्षप्रवेशाचे वारे वाहत असून रणजितसिंह मोहिते पाटील विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा पक्षश्रेष्ठींना पाठवला असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. रात्रीच शरदचंद्र पवार पक्षात मोहिते पाटील प्रवेश करणार आहेत. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते हे देखील शनिवारी होणाऱ्या संसदीय बैठकीला हजेरी लावणार आहेत. आजच्या बैठकीनंतर रणजीतसिंह मोहिते यांचा प्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे.
भाजपला रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या रुपाने मोठा धक्का बसलेला आहे. लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील घराण्याने आपला इदारा बदलून पुन्हा शरद पवार यांच्या पक्षाकडे जाण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील आणि पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि निवडूनही आणले. वडील आणि चुलत भावाचा अधिकृत पक्षप्रवेश झाला परंतु स्वत: रणजितसिंह यांनी अधिकृत राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचे टाळले. पडद्याआडून ते सारी सूत्रे हलवत होते. अगदी धैर्यशील मोहिते पाटील यांची लोकसभा प्रचारयंत्रणा रणजितसिंह यांनीच सांभाळल्याचे सांगितले जाते.
माढा विधानसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून भाऊ रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत तुतारीची साथ सोडून भाजपला मदत करणारे अभिजीत पाटीलही सातत्याने शरद पवारांची भेट घेत आहेत. तर आमदार बबन शिंदेंही माढ्यातून तुतारीवर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.