
कराड : राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी खोडशी (ता. कराड) येथील कृष्णा नदीवरील बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता व देखभाल दुरुस्तीबाबत माहिती जाणून घेतली. सदरच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी निधीची गरज असल्याची माहिती ग्रामस्थांनी आ. चव्हाण यांना दिली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासाचा समतोल साधला आहे. अनेक महत्त्वाच्या विकासकामांसह त्यांनी मूलभूत विकासासाठी निधी आणून विकासाची प्रक्रिया अखंड सुरू ठेवली आहे. याचबरोबर ते मतदारसंघातील जनतेशी थेट संपर्क ठेवून आहेत.
याच धर्तीवर आ. चव्हाण यांनी खोडशी येथे भेट देवून ग्रामस्थांशी संवाद साधला. व काही कुटुंबांच्या दुःखद प्रसंगी भेट देत त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी गावालगत असलेल्या कृष्णा नदीवरील बंधाऱ्याची पाहणी केली. यावेळी त्यांना ग्रामस्थांनी बंधाऱ्याची वस्तुस्थिती सांगितली. या बंधाऱ्यातून कृष्णा कालव्याचा उगम होतो. हा कालवा कराड, वाळवा, पलूस व तासगाव तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीसाठी वरदान ठरणारा आहे. त्यामुळे बंधाऱ्याचे महत्व तितकेच अधोरेखित करण्यासारखे आहे. बंधाऱ्याची ठिकठिकाणी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. याकरिता आ. चव्हाण यांनी सरकारकडे पाठपुरावा करावा. अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी सुरेश भोसले (सावकार), हणमंतराव भोपते, अमृतराव पवार, महेंद्र कदम, विजय माने, प्रवीण पुजारी, मोहनराव पाटील, भीमराव पाटील यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते