
नवी दिल्ली : चार दिवसांच्या संघर्षानंतर रेवंत रेड्डी यांनी अखेर आज गुरुवारी (7 डिसेंबर) तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित या कार्यक्रमात लाखो लोकांच्या उपस्थितीत राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी रेवंत रेड्डी यांना शपथ दिली.
रेवंत रेड्डी यांच्यासह मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याशिवाय नलमदा उत्तम कुमार रेड्डी, सी. दामोदर राजनरसिम्हा, कोमातीरेड्डी वेंकट रेड्डी, दुडिल्ला श्रीधर बाबू, पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, पोन्नम प्रभाकर, कोंडा सुरेखा, डी. अनसूया सीथाक्का, तुम्माला नागेश्वरा राव, जुपल्ली कृष्णा कुमार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संसदीय पक्षाच्या (सीपीपी) अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, दीपेंद्र हुडा यांसारखी मोठी नावे शपथविधीला उपस्थित होती. याशिवाय काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा रेवंत रेड्डी यांनीही उपस्थिती दर्शवली.
दोन दिवसांपूर्वी रेवंतच्या नावावर झाले शिक्कामोर्तब
निवडणुकीचे निकाल आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक नावे होती. अचानक बातमी आली की रेवंत रेड्डी राज्याचे मुख्यमंत्री होणार असून ते सोमवारी संध्याकाळी शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर पक्षातील काही नेत्यांनी विरोध सुरू केला आणि शपथविधी सोहळा रद्द करावा लागला. यानंतर पक्षाच्या हायकमांडने दिल्लीत रेवंत रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली. असे सांगितले जात आहे की, सहा वेळा आमदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष एन. उत्तम कुमार रेड्डी आणि मल्लू भट्टी विक्रमार्क यांनी रेवंत रेड्डी यांना विरोध केला होता.
रेवंत हा काँग्रेसच्या प्रचाराचा चेहरा होता
रेवंत यांच्या विरोधकांनी त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांची पहिली पसंती राहिले, तेलंगणातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी आणि नंतरही ते बीआरएसच्या विरोधात काँग्रेसच्या प्रचाराचा चेहरा राहिले. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 119 पैकी 64 जागा जिंकल्या आहे.