दिल्लीत रासपचे सरकार आणा, आरक्षणाचा प्र्रश्न मी सोडवतो
माजी मंत्री महादेव जानकर यांची ग्वाही

कराड ः आरक्षणाचा प्रश्न हा मी आमदार म्हणून अथवा राज्य शासनाच्या हातात नाही. तो दिल्लीच्या हातात आहे. मला खासदार करून पाठवा. दिल्लीत रासपचे सरकार आणा, पंजाबराव पाटील यांना कराडात रासपचे खासदार करा. मी तुमचा आरक्षणाचा प्रश्न दहा मिनिटात सोडवून टाकतो अशी ग्वाही माजी मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
ऊसाला पाच हजार रूपये दर मिळावा यासाठी रासप व बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने कराड येथे रॅली काढण्यात आली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दत्त चौक येथील छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीची सुरूवात करण्यात आली. ही रॅली दत्त चौक मार्गे स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, कृष्णा नाका मार्गे पाटणकडे रवाना झाली.
जानकर पुढे म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. संसदेत ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवला पाहिजे. 2009 साली मी पहिल्यांदा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाचा हक्कदार असल्याबाबत पुस्तक लिहले आहे.
तामिळनाडूत 63 टक्के आरक्षण आहे, मग महाराष्ट्रात असे का होत नाही ? असा प्रश्न उपस्थित जनतेने केला पाहिजे.
आमच्या हातात सत्ता द्या. आमच्याजवळ आज सत्ता आहे का? आम्ही बाहेर आहोत. धनगर समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. देशात छत्रपती शाहू महाराज यांनी प्रथम आरक्षण सुरू केले. आज त्यांच्याच समाजाला 70 वर्षाने आरक्षण मागावे लागत असल्याची सांगत हे अपयश कोणाचे असा प्रश्नही माजी मंत्री महादेव जानकर यांनी उपस्थित केला आहे.