
कराड, दि. 10 ः अल्पवयीन मुलाचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास आणि सात हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा ठोठावली.
हानिफ नालसाब शेख (वय 66, रा. शाही मोहल्ला, पाडळी, ता. कराड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पाडळी येथील हानिफ शेख याने फिर्यादीच्या नातवास घरी बोलावून तो अल्पवयीन आहे हे माहित असतना देखील त्याचे लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने त्याचा विनयभंग केला. याबाबत पिडीत मुलाच्या नातेवाईकांनी कराड शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून हानिफ शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ॲड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. यामध्ये त्यांनी पाच साक्षीदार तपासले. शहा यांनी जोरदार युक्तीवाद केला. तसेच तपासी अधिकारी पी. एस. जाधव तसेच फिर्यादी, साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने हानिफ शेख याला तीन वर्ष सक्षम कारावास आणि सात हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
सरकार पक्षाला ॲड. ऐश्वर्या यादव, ॲड. कोमल लाड, ॲड. रिचा शहा, पोलीस हवालदार एस. व्ही. खिलारे, महिला पोलीस आर. पी. घोरपडे, सहाय्यक पोलीस फौजदार मदने यांनी सहकार्य केले.