
कराड ः सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षाचे 400 रुपये आणि चालू एफआरपी 3 हजार 500 रुपये जाहीर न करताच साखर कारखाने सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून कराड तालुक्यातील वाठार-रेठरे आणि कराड-चांदोली मार्गावर ऊसाची वाहनं रोखली असून बराच काळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. घटनास्थळावर कराड तालुका पोलिसांनी मोठा पोलीस पाऊस फाटा तैनात करण्यात आला होता. पुढील चार दिवसात एफआरपी जाहीर करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील वर्षीच्या उसाला 400 रुपये व चालू वर्षाच्या उसाला 3 हजार 500 पहिली उचल जाहीर करून कारखाने चालू करा असे जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही अथवा मागील वर्षीचे 400 रुपये देण्याची भूमिका घेतलेली नाही. यामुळे आज वाठार आणि पाचवड फाटा (ता. कराड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा आणि रयत कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कराड दक्षिणचे अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे कराड उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे, पक्ष उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, सातारा तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ आणि कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामीण पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. साखर कारखान्याचे प्रशासन अधिकारी यांच्या आश्वासनानंतर आणि पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने ऊस वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.