गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात वादाची ठिणगी

मुंबई ः मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदासंघावरून शिवसेना (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता हा वाद टोकाला गेला आहे. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असं थेट हल्लाबोल रामदास कदमांनी गजानन कीर्तिकरांवर केला होता. याला गजानन कीर्तिकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गद्दार रामदास कदमांच्या तोंडी दुसऱ्यांच्या गद्दारीची भाषा हास्यास्पद आहे, अशी टीका गजानन कीर्तिकरांनी केली आहे.
“गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात, तर मुलगा ठाकरे गटात आहे. फक्त लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरून घरी बसू नका. पक्षाशी बेईमानी होणार नाही, याची काळजी घ्या. तुम्हाला विरोध करण्याचं कारण नाही. पण, एकाच कार्यालयात मुलगा आणि वडील बसतात. काय करताय हे सर्व जग पाहतेय. मुलगा ठाकरे गटातून तर तुम्ही शिंदे गटातून अर्ज दाखल कराल. नंतर मुलाला बिनविरोध निवडून द्यायचं, असं कटकारस्थान होता कामा नये. पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसू नका, ही विनंती आहे,” असं रामदास कदमांनी म्हटलं होतं.
यावर एक परिपत्रक काढत गजानन कीर्तिकरांनी रामदास कदमांना लक्ष्य केलं आहे. गजानन कीर्तिकर म्हणाले, “रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. 1990 साली मी मालाड विधानसभेतून निवडणुकीला उभा होतो, त्याचवेळेला रामदास कदम खेडमधून निवडणूक लढत होते. माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्यांनी खेडला नेले आणि मला पाडण्यासाठी प्रयत्न केले.”
“खेड-भरणा नाका ते भोर-पुणे शरद पवार यांच्या गाडीत बसून रामदास कदम राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत सविस्तर चर्चा करीत होते, हे त्यांनी विसरू नये आणि खेडमधील शिवसैनिक देखील हे विसरलेले नाहीत. एवढेच कशाला कांदिवली पूर्व महानगरपालिकेच्या वॉर्डामधून त्यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेना पक्षातून निवडणूक लढत असताना, त्यांना निवडून आणू नका म्हणून सर्व कार्यकर्त्यांना रामदास कदम हे दमबाजी करीत होते,” असा गौप्यस्फोटही कीर्तिकरांनी केला आहे.