
कराड : टीव्ही, मोबाईल यामुळे लहान मुलं अभ्यासात, खेळात रमत नाहीत अशी पालकच तक्रार करताना दिसतात. पण, नांदगावात आयोजित केलेल्या किल्ला बनवा स्पर्धेमुळे हे लहानगे किल्ल्यांच्या विश्वात रमणल्याचे पाहायला मिळत आहे. रायगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी आदींच्या प्रतिकृती या चिमुकल्या हाताने साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसतोय. नागरिकांच्यातून त्यांचे तितकेच कौतुकही होत आहे.
नांदगाव (ता. कराड) येथे गतवर्षीपासून मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे स्मृती मंच व कै.सौ. द्वारकाबाई तुकाराम सुकरे प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे किल्ला बनवा स्पर्धा आयोजित करीत आहेत. यंदाही त्यांनी या स्पर्धा आयोजित केल्या असून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. १००वर शालेय विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे.
सोमवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत परिक्षक तानाजी पाटील, विजय पाटील ,संतोष तांबवेकर या परीक्षकांनी किल्ले बनवा स्पर्धेच्या परीक्षेला सुरुवात केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश पाटील, उपाध्यक्ष जयवंत मोहिते, सागर कुंभार, हितेश सुर्वे, रोहित मुळीक, केतन पाटील, विक्रम पाटील, शंकरराव पाटील आदींची उपस्थिती होती.
दगड, माती, वीट याचा वापर करून या शालेय विद्यार्थ्यांनी प्रतापगड, लोहगड ,रायगड, पन्हाळा, सज्जनगड, राजगड, तोरणा ,शिवनेरी, प्रचितीगड, सज्जनगड अआदी किल्ले साकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर हे विद्यार्थी तितक्या धिटाईने या किल्ल्यांची माहिती पाहायला आलेल्या लोकांना देताना दिसत आहेत. या उपक्रमाचे पालकांच्यातून कौतुक होत आहे.