सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास ढळल्यामुळे व्यक्तिगत टीका
माढा येथे शरद पवारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

माढा ः शरद पवार सध्या माढा दौऱ्यावर असून कापसेवाडीत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातील प्रचारसभांमधून विरोधकांवर परखड शब्दांत टीका करत असल्याबाबत विचारणा केली असता त्यावरून शरद पवारांनी मोदींना लक्ष्य केलं.
“दुर्दैवाने ज्या पद्धतीच्या गोष्टी पंतप्रधान मांडत आहेत, त्या प्रकारचं राजकारण आम्ही कधी पाहिलं नाही. मी पंडित जवाहरलाल नेहरूंची भाषणं ऐकली आहेत. तेव्हा मी कॉलेजला शिकत होतो. त्यानंतर इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्रींपासून सर्व पंतप्रधानांची भाषणं मी ऐकली. त्यांनी एक पथ्य असं पाळलं की पंतप्रधान कुठल्याही राज्यात गेले, तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत अनादरानं कधीही काही बोलले नाहीत. पण हे पहिले पंतप्रधान आहेत की जे एखाद्या राज्यात जातात आणि तिथे जर इतर पक्षाचं नेतृत्व असेल तर त्यांच्यावर व्यक्तिगत हल्ले करतात”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास ढळल्यामुळे अशी विधानं केली जात असल्याचा आरोप केला. “या पाच राज्यांच्या निवडणुकांदरम्यान हेच चित्र दिसतंय. माझी खात्री आहे की लोक हे मान्य करणार नाहीत. याची किंमत मोदींना चुकवावी लागेल. ज्यावेळी आत्मविश्वास ढळतो, त्यावेळी अशा व्यक्तिगत टीका-टिप्पणी माणूस करायला लागतो. असं कोणत्याही पंतप्रधानांनी केलं नव्हतं. दुर्दैवाने असं करणाऱ्या व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता आहे. त्याचे परिणाम दिसतील”, असं शरद पवार म्हणाले.
“मध्य प्रदेशात भाजपाला जिंकून आणा, रामलल्लाचं दर्शन मोफत करून देऊ”, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशातील एका सभेत बोलताना केली. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना शरद पवारांनीही त्यांच्यावर तोंडसुख घेतलं. “मंदिरात जायला काय पैसे द्यावे लागतात का? पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला काही पैसे द्यावे लागत नाहीत. पण हे राम मंदिरात तुम्हाला दर्शन फुकट वगैरे सांगतायत याचा अर्थ इतक्या पातळीवर राज्यकर्ते उतरलेत, की त्याची चर्चाही न केलेली बरी”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.