ताज्या बातम्याराज्यसातारा

मनोज जरांगे-पाटील यांच्या मागे कोणी आहे का हे तपासावं लागेल

मराठा-ओबीसी संघर्षावर राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य

मुंबई ः मराठा आरक्षणाला राज्यातल्या ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण तापू लागलं आहे. आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी नेते (राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री) छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. भुजबळ यांच्यासह कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी जालन्यात ओबीसी समाजाचा महामेळावा आयोजित करून मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिलं आहे. राज्यातल्या अनेक नेत्यांमुळे ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू झाला आहे. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले, मुळात आता कोणत्याही प्रकारचं आरक्षण मिळणार नाही. हीच गोष्ट मी मनोज जरांगे यांना भेटलो तेव्हा त्यांनादेखील सांगून आलो होतो. मी आता काही वेगळं सांगत नाही. अशी कुठलीही गोष्ट होणार नाही (आरक्षण मिळणार नाही). मनोज जरांगे पाटील यांच्या मागून कोणी आहे का? हे तपासावं लागेल. या आरक्षण प्रकरणामुळे जातीयवाद निर्माण करून राज्यातील सुव्यवस्थेचा भंग करायचा असं कोणी ठरवलं आहे का? निवडणुका तोंडावर असताना अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. मला हे सगळं चित्र सरळ दिसत नाही.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, या सगळ्यामुळे मुळ मुद्दे भरकटले जात आहेत. इतरही अनेक महत्त्वाचे विषय आहेत, परंतु, तुम्हाला वेगळ्या मुद्यांमध्ये गुंतवून ठेवलं जात आहे. ज्या गोष्टींमुळे लोक त्रस्त आहेत ते विषय जनतेच्या डोक्यात येता कामा नये, असा प्रयत्न होतोय. लोकांचं लक्ष वेगळ्या गोष्टींकडे वळवलं जात आहे.

मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंतरवाली सराटी या गावी (उपोषणस्थळी) जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. तसेच मनसे तुमच्याबरोबर असल्याचं जरांगे यांना सांगितलं होतं. त्यापाठोपाठ राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करणारं पत्र लिहिलं होतं. या पत्रात राज ठाकरे यांनी म्हटलं होतं, इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवं आहे. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार अशी यांची वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं-घेणं नाही. अशा खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही म्हणून तुमचं उपोषण तुम्ही तत्काळ थांबवावं अशी विनंती करायला हे पत्र लिहित आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात लिहिलं होतं की, आरक्षणासारख्या प्रश्नांना हात घालण्याची या राज्यकर्त्या मंडळींची इच्छा नाही. नुसतं जातीच्या नावानं मतं मागायची, खोटी आश्वासनं द्यायची असे यांचे उद्योग. आपणही मग भाबडेपणानी यांना मतदान करतो. आपल्या जातीचा म्हणून आपला वाटला, आपल्यासाठी काही करेल असं वाटलं म्हणून यांना मतदान केलंत. एकदा नाही अनेकदा केलंत. त्याचा यांनी गैरफायदा घेतला. ही माणसं फार निष्ठुर आहेत. कोण गेलं, कुणाला इजा झाली या गोष्टींनी यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही नका जीव पणाला लावू.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close