सांगलीच्या जागेचा तिढा जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत बैठकीला उपस्थित राहणार नाही : आ. विश्वजीत कदम

सांगली : लोकसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीत अद्याप काही जागांवर तिढा सुटलेला नाही. यामध्ये ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागावेर उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मात्र तरीही या जागेवरून वाद सुरू आहे.
ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केलीय. तर सांगलीत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे इच्छुक आहेत. आता सांगलीच्या उमेदवारीवरून विश्वजीत कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून थेट इशारा दिला आहे.
विश्वजीत कदम यांची काँग्रेसने राज्य प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड केली आहे. मात्र सांगली लोकसभा उमेदवारीवरून आक्रमक झालेल्या विश्वजीत कदम यांनी काँग्रेसच्या राज्य प्रचार निवड बैठकीला हजर राहणार नसल्याचं सांगितलं आहे. सांगलीच्या जागेचा तिढा जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पत्रात विश्वजीत कदम यांनी म्हटलं की, नाना गावंडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचे दिनांक ३० मार्च रोजीचे काँग्रेस राज्य प्रचार समितीच्या निवडीचे व बैठकीचे पत्र मला मिळाले. आपण माझी प्रचार समितीच्या सदस्यपदी निवड केली त्याबद्दल मी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथलाजी व आपला मनापासून आभारी आहे.
राज्यात आगामी लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी म्हणून आपण सर्वजण ताकदीने लढवणारच आहोत. माझी व सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांची सांगली लोकसभेच्या जागेबाबतीत असणारी भावना आपण जाणत आहात. गेल्या काही दिवसांपासून सांगली व राज्यातील इतर काही लोकसभेच्या जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवण्यास सक्षम आहे या भूमिकेवरती मी व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते आज ही ठाम असल्याचं विश्वजीत कदम यांनी म्हटलंय.
अद्याप सांगली लोकसभा जागेबाबतीत काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला कोणताही निर्णय कळविलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नाही, तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता व आमदार म्हणून मी या बैठकीस अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचं विश्वजीत कदम यांनी पत्रात म्हटलं आहे.