उद्धव ठाकरेंना सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी तीन दिवस दिल्लीला जाऊन बसावं लागतं : देवेंद्र फडणवीस

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातून विस्तवही जात नाही हे आता महाराष्ट्राला कळलं आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी एक तर तू राहशील किंवा मी राहिन असं म्हणत थेट देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं होतं.
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना दिल्लीवाऱ्या कराव्या लागतात असंही वक्तव्य केलं होतं. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मला घोषित करा हे सांगण्यासाठी दिल्लीला जावं लागतं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
“मी भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार या चर्चा सुरु आहेत, अशा चर्चा घडतात. काही वेळा बातम्याच चालवण्यासाठी नसतात तेव्हा अशा बातम्या दिल्या जातात. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझ्या पक्षाला माझी महाराष्ट्रात आवश्यकता आहे हे माहीत आहे. मला जर पक्षाने सांगितलं की दिल्लीत यायचं तर मी दिल्लीत जाईन. नागपूरला बसायला सांगितलं तर तिथे थांबेन” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मला उद्धव ठाकरेंची खरंच दया येते. एक काळ असा होता की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मातोश्रीमध्ये असत. त्यावेळी दिल्लीतले सगळे नेते मातोश्रीवर यायचे. आता उद्धव ठाकरेंना तीन दिवस दिल्लीला जाऊन बसावं लागतं. सोनिया गांधींच्या भेटीसाठी वाट बघावी लागते. सोनिया गांधींना जेव्हा भेटतात तेव्हा सोनिया गांधी फोटोही काढू देत नाहीत. फोटो न काढताच त्यांना दिल्लीहून परत यावं लागतं. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी आमच्यावर बोलू नये. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आम्ही दिल्लीला जातोच, देशाच्या पंतप्रधानांना भेटायला जातो. ममता बॅनर्जीही जातात, विरोधातले इतर नेतेही जातात. जर आपल्या राज्याचा विकास करायचा असेल तर केंद्रात पंतप्रधानांची भेट घ्यावीच लागते. मात्र उद्धव ठाकरे लाचारी पत्करुन सोनिया गांधींना भेटता आणि त्यांना सांगता की मला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवा आणि त्या नकार देतात. मग लाचारी कोण करतंय? असा प्रश्न विचारुन देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. एका चॅनलला देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
तुमच्यावर व्यक्तिगत शाब्दिक हल्ले केले जातात, तेव्हा काय वाटतं? असं विचारण्यात आलं तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझ्यावर व्यक्तिगत शाब्दिक हल्ले किंवा टीका होते याची मला सवय झाली आहे. आम्ही भगवान शंकराचे भक्त आहोत, आम्ही हलाहल पचवू शकतो आणि जगूनही दाखवतो. हे सगळे लोक फक्त दुषणं देऊ शकतात. गरजते हैं वो बरसते नहीं है.” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांनाही टोला लगावला आहे.