राजकियराज्यसातारा

महाविकास आघाडीचे विधानभवन परिसरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात आंदोलन

नागपूर : राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयांची स्थिती अत्यंत बिकट असून तिथे औषधे उपलब्ध नाहीत. रुग्णमृत्यू वाढले आहेत. औषध खरेदी थांबलेली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मंगळवारी विधानभवन परिसरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याविरोधात आंदोलन केले.

विरोधकांनी तोंडाला मास्क, गळ्यात टेथेस्कोप घालून आणि स्ट्रेचर आणून आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप केला.

विरोधकांनी विधानभवन परिसरात मोर्चा काढत सरकार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात निदर्शने केली. यावेळी ‘जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ ‘नाही औषध नाही गोळी, आरोग्य व्यवस्थेची झाली होळी,’ ‘शासकीय रुग्णालयात नाहीत डॉक्टर नाहीत नर्सेस, त्यामुळे वाढताहेत मृत्यूच्या केसेस’ असे फलक घेऊन सरकारविरुद्ध निषेध नोंदविण्यात आला. गेल्या चार महिन्यांत चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ४३६ मृत्यू, नांदेडमध्ये २४ मृत्यू, ठाणे-कळवा येथे २४ आणि छत्रपती संभाजीनगर येथेही २४ मृत्यू झाल्याकडे विरोधकांनी लक्ष वेधले.

राज्यभरातील विविध शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू वाढला आहे. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला. आरोग्य व्यवस्थेचे पुरते तीनतेरा वाजले आहेत, असे म्हणत विरोधकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सचिन अहिर, विकास ठाकरे, सतेज पाटील, यशोमती ठाकूर आदींचा सहभाग होता.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, सरकार अपयशी ठरले आहे. राज्याची आरोग्य व्यवस्था ऑक्सिजनवर आहे. औषध खरेदी होत नसल्याने गरीब रुग्णांना बाहेरून औषधे विकत घ्यावी लागतात. शासकीय रुग्णालयात सुविधा नसल्यामुळे खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. याचा निषेध म्हणून आम्ही आरोग्य मंत्री आणि आरोग्य यंत्रणेविरुद्ध प्रतीकात्मक आंदोलन केले आहे. यावेळी विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, विकास ठाकरे, सचिन अहिर आणि इतरही आमदार उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close