
कराड : येरवळे (ता. कराड) येथील ग्रामीण मार्ग नं. 168 नविन गावठाण पारापासून ते जालिंदर सुर्वे यांचे घरापर्यंत २ कि. मी अंतराचा रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी युवानेते विजयसिंह पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचेकडे सातारा येथे केली आहे. या रस्त्याला लवकरच निधी देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहे.
येरवळे (ता. कराड) येथील ग्रामीण मार्ग नं. 168 नविन गावठाण पारापासून ते जालिंदर सुर्वे यांचे घरापर्यंत २ कि.मी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करणे कामासाठी शासकीय निधीची आवश्यकता आहे. याबाबतचा येरवळे ग्रामपंचायतीने ठराव केलेला आहे.
येरवळे (ता. कराड) या गावाची भौगोलीक सिमा अंदाजे १० किमी इतकी असुन गावाची लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. गावात मुख्य पिक ऊस असुन काही शेतकरी भाजीपाला व्यवसाय करतात. गावाच्या उत्तरेला कोयना नदी असुन नदीवरून गावाने शेतीसाठी एकत्रित जॅकवेल बसवून शेतीला पाण्याचा पुरवठा केला आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांना एकच मुख्य रस्ता आहे. विंग होटेल अप्रोच नविन गावठाण ते जुने गावठाण (येरवळे) असा वाहतुकीचा एकच मुख्य रस्ता आहे. याच रस्त्याने शेतमाल वाहतूक केली जाते.
ग्रामीण मार्ग नं.168 नविन गावठाण पारापासून ते जालिंदर सुर्वे यांचे घरापर्यंत रस्ता २ कि.मी लांबीचा आहे. या रस्त्याची रुंदी जेमतेम असल्याने एकावेळी दोन वाहने समोरासमोर आल्याने वाहनास ये जा करता येत नाही. त्याशिवाय एका वेळी दोन वाहने समोरासमोर आल्यास अडथळा निर्माण होतो. वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा होत आहे
तसेच नागरिकांना, वयोवृद्धांना शहराच्या ठिकाणी महत्वाच्या कामासाठी ये-जा करण्यासाठी येरवळे गावठाण ते विंग हॉटेल यादरम्यान कोणतीही वाहतूक सुविधा नसल्याने नागरिकांची व विद्यार्थ्यांची, शेतकरी वर्गाची गैरसोय निर्माण होत आहे.