
कराड ः दोन बोकड, एक शेळी व दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना कराड तालुका गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी म्होप्रे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीला गेलेले दोन बोकड, एक शेळी व दुचाकी असा एकूण 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तानाजी महादेव चव्हाण व सुरज रमेश शिंदे दोघेही (रा. म्होप्रे, ता. कराड) अशी ताब्यात घेतलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्होप्रे ता. कराड गावच्या हद्दीतून उत्तम जयराम जाईगडे यांचे बंदीस्त शेडातून शंकर आनंदा पुजारी यांची तसेच गावातील सुनिल रमेश संकपाळ यांचेसुद्धा बंद शेडमधून तानाजी चव्हाण व सुरज शिंदे या दोघांनी स्वतःच्या फायद्याकरिता दोन बोकड व एक पाटशेळी चोरून नेली. तसेच शशिकांत नंदकुमार जाधव यांची एक दुचाकीही चोरून नेली. याबाबत सोमवारी कराड तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. डीवायएसपी अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी या घटनेचा तपास करण्याच्या सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नितीन येळवे, सज्जन जगताप, सचिन निकम, उत्तम कोळी, प्रफुल्ल गाडे, प्रदीप कांबळे, गणेश वेदपाठक, समीर कदम यांनी फिर्यादीचे मदतीने गावातील संशयित तानाजी चव्हाण व सुरज शिंदे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांचेकडून दोन बोकड, एक शेळी व दुचाकी असा एकूण 75 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलीस हवालदार नितीन येळवे करीत आहेत.