ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती प्रतिथयश व्यक्तींनी करून त्याला प्रोत्साहन देऊ नये
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेलिब्रिटींना केले खास आवाहन

नागपूर : राज्यासह देशात मागील काही वर्षांपासून ऑनलाइन गेमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. क्रिकेट आणि सिनेमासह विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटींकडूनही गेमिंग अॅपच्या जाहिराती केल्या जात आहे. त्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणत ऑनलाइन गेमिंगकडे वळत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेलिब्रिटींना खास आवाहन केलं आहे. “ऑनलाइन गेमिंगच्या जाहिराती प्रतिथयश व्यक्तींनी करून त्याला प्रोत्साहन देऊ नये, असं आवाहन मी या सर्वोच्च सभागृहाच्या माध्यमातून करतो,” असं फडणवीस म्हणाले.
सभागृहात आज भाजप आमदार आशिष शेलार यांनी महादेव अॅपकडून अनधिकृतपणे कमावलेल्या पैसा मुंबईत कन्स्ट्रक्शनच्या उद्योगात गुंतवला जात असल्याचा आरोप केला. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की,”महादेव ॲपचे प्रकरण केंद्रीय यंत्रणांकडे आहे. राज्यातील प्रकरणाची चौकशी राज्य सरकार करत आहे. एडलवाईजबाबत निश्चितपणे तपास करण्यात येईल.ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती प्रतिथयश व्यक्तींनी करून त्याला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन मी या सर्वोच्च सभागृहाच्या माध्यमातून करतो. तरुण पिढीचे नुकसान होऊ नये, यासाठी अधिक कठोर नियम करण्याची विनंती केंद्र सरकारला सुद्धा आम्ही करू.”