
कराड ः यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराडचे नाव सर्वदूर पसरलेले असून या महाविद्यालयाचे विद्यार्थी खूप भाग्यवान आहेत त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या दूरदृष्टीच्या नेत्याच्या विचाराने चाललेल्या महाविद्यालयात शिक्षण घ्यायला मिळते तसेच पी. डी.पाटील यांनी शिक्षण क्षेत्रातील उभे केलेले हे शिखर आज सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे. खरे तर हे ऋण आज नवी पिढी जपण्याचे काम करते, वेगवेगळ्या उपक्रमातून या महाविद्यालयाने नेहमीच लौकिक वाढवलेला आहे. आज या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून अनेक बाल वैज्ञानिक तयार होतील, असे प्रतिपादन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड व सातारा जिल्हा परिषद, सातारा, कराड पंचायत समिती (शिक्षण विभाग) कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 51 व्या कराड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
ते बोलताना पुढे म्हणाले, विज्ञानन प्रदर्शनातून नवनवीन संशोधनाला चालना मिळेल. या संशोधनाचा उपयोग निश्चितच सर्वसामान्यांच्या गरजेसाठी होईल. ही संशोधनातील प्राथमिकता आपल्या पुढील आयुष्यासाठी प्रेरक ठरेल. शिक्षक हा विद्यार्थ्यांना कृतिशील बनवणारा, पैलू पाडणारा मुख्य घटक असून आज हे सर्व शिक्षकांच्या प्रेरणेने संपन्नतेकडे वाटचाल करत आहे. कराड ही विद्येची नगरी असून खरोखरच हे साध्य होताना दिसते. प्रदर्शनातील वेगवेगळ्या प्रयोगातून विषयातील विविधता शोधा आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा दैनंदिन व्यवहारात वापर करा.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संमती देशमुख यांनी केले यामधून तालुकाप्रदर्शनाचा उद्देश हेतू त्यांनी व्यक्त केला. यावेळी अल्ताफहुसेन मुल्ला यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांनी करुन महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी पाटील व एस. यु. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. एल. महामुनी यांनी मानले.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त सदस्य अरुण पाटील, विजय परीट, नितीन जगताप, जमिला मुलाणी, एस. एन. गाडे, कराड तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व बालवैज्ञानिक विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.