
कराड : कराड-ढेबेवाडी मार्गावर पेट्रोलिंग करीत असताना महामार्ग पोलिसांना चचेगाव (ता.कराड) नजीक एका कारची दुभाजकाला ठोकरून अपघात झाल्याची माहिती मिळाली. पोलिस घटनस्थळी पोहचताच कारच्या चालकाने ऊसाच्या शेतात पळ काढला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये डिझेलचे तिस लिटरचे तिन कॅन संशयास्पद रित्या आढळुन आले. याबाबत हवालदार सचिन पाटील यांनी तालुका पोलिसांत खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास महामार्ग पोलिस मदत केंद्र कराडचे पोलिस हवालदार सचिन पाटील, सचिन चव्हाण, विकास साळुंखे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना चचेगाव नजिक ढेबेवाडीकडील बाजूस दुभाजकाला धडकुन एका कारचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली यावेळी पोलिसांना पाहून चालकाने ऊसाच्या शेतात पळ काढला. पळ काढलेला चालक हा सराईत गुन्हेगार असुन याचे नाव राजेंद्र हजारे (रा.उंब्रज ता.कराड) असल्याचे पोलिसांनी सांगीतले.
पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये डिझेलचे तिस लिटरचे तिन कॅन संशयास्पद रित्या आढळुन आले आहेत. पोलिसांनी कारसह डिझेलचे कॅन जप्त केले आहेत. तालुका पोलिस अधिक तपास करीत आहेत.