दिल्लीतल्या लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करून तुम्हाला राम पावणार नाही
खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

मुंबई: लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची हे ढोंग आमच्याकडे नाही. राम मंदिर आणि लोकशाहीचं मंदिर दिल्लीतील संसद यांची प्रतिष्ठा जपलीच पाहिजे. जर दिल्लीतल्या लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करून तुम्ही राम मंदिरात पूजा करणार असाल तर तो राम पावणार नाही, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला फटकारले.
संसदेतील घुसखोरीवरून प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करून संसदेत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावरून संजय राऊतांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, लोकशाहीच्या मंदिराचं स्मशान करायचं आणि अयोध्येत जाऊन राम मंदिरात पूजा करायची हे ढोंग आमच्याकडे नाही. खासदारांना निलंबित केल्याप्रकरणी आम्ही लढणार आहोत. या देशातील हुकूमशाहीविरोधात आम्ही लढणार आहोत. लोकशाहीची हत्या सुरू आहे त्याविरोधात लढणार आहोत. गुडघे टेकायला आम्ही मिंधे नाही. असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी लगावला.