कायदा-सुव्यवस्था काय असते, हे अजित पवार दाखवतील : बजरंग सोनावणे

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घ्यावं असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केलं आहे.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे फडणवीसांनी घ्यावे अशी मागणी करणार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर आता खासदार सोनावणेंनी अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद घ्यावं असं वक्तव्य केलं आहे.
लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या मीडियाला या तपास बाबतीत कोणतीही माहिती दिली जात नाही असेही सोनावणे म्हणाले. लोकप्रतिनिधी म्हणून मला देखील माहिती मागितल्यावर दिली जात नाही. पण किमान 24 तासानंतर तर माहिती जाहीर केली पाहिजे. आरोप असलेल्या लोकांचे सरकारमधील पक्षाशी संबंध आहेत, त्यामुळे संशय बाळवत असल्याचे सोनावणे म्हणाले.
कोणत्या लोकप्रतिनिधीने CID कडे तपास द्यावा अशी मागणी केली होती? मी CBI कडे तपास द्या अशीच मागणी केली होती असे सोनावणे म्हणाले. या संदर्भात मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी तसा शब्द दिला होता असे सोनावणे म्हणाले. अमित शाह स्वतः तपासावर लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे बरं चाललं आहे नायतर हे कुठं गेलं असतं माहित नाही असेही सोनावणे म्हणाले. संतोष देशमुख यांच्या हत्येला 22 दिवस झालेत, पण आरोपी अद्यापही सापडले नाहीत, आधी आरोपी तर अटक करा. मास्टर माईंड कोण आहेत हे पोलिसांनी शोधावं मी नावं घेणार नाही असेही सोनावणे म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलं की खंडणीतील आरोपी आणि माझे संबंध आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली हे माहिती नाही, त्याच्यावर तेच स्पष्ट सांगू शकतील असेही सोनावणे म्हणाले. बीडमधल्या जन्मलेला मुलालाही माहिती की इथ काय घडतंय असे सोनावणे म्हणाले. महाराष्ट्राच्या जनतेसाठी मी सांगतो की बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. कायदा आणि सव्यवस्था राखायचे असेल तर एसपी बदला असे मी सांगितले होते. मुख्यमंत्र्यांचे आभार त्यांनी एसपी बदलले असेही सोनावणे म्हणाले. पण केवळ एसपी बदलून चालणार नाही. नवीन एसपींना माझ सांगण आहे की, पोलीस स्टेशनचे निरीक्षक काय धंदे करतात? त्यांना देखील बदलणे गरजेचं असल्याचे सोनावणे म्हणाले.
गणेश मुंडे नावाचा पीआय, त्याने काय गिफ्ट दिलंय माहिती नाही, एक दिवशी जातो पुन्हा येतो, आरोपी सोबतही असतो असे सोनावणे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडचे पालकमंत्री घेऊ शकतात की नाहीत हे माहिती नाही. पालकमंत्री कोणाला द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण अजितदादांना किमान त्यांचे सोंगाडी काय करतात बीड जिल्ह्यात हे पाहण्यासाठी तर पालकमंत्री पद घ्यावं असा टोला सोनावणे यांनी लगावला. कायदा आणि सुव्यवस्था काय असते हे अजित पवार दाखवू शकतात असेही सोनावणे म्हणाले.