
कराड : शहर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेच्यावतीने रविवारी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभुमीवर शहरासह परिसरात नाकाबंदी करण्यात आली. यावेळी मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्यासह गोंधळ घालणाऱ्या एकुण वीसजणांवर कारवाई करण्यात आली.
थर्टी फर्स्ट साजरा करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्यप्राशन करुन वाहने चालवितात. तसेच मद्यधुंद स्थितीत अनेक ठिकाणी गोंधळ घातला जातो. या पार्श्वभुमीवर कराड शहर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेच्यावतीने शहरातील कराड-तासगाव मार्ग, कराड-पाटण मार्ग, कराड-विटा आणि कराड-मसूर मार्गावर ठिकठीकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच शहर परिसरातही साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. नाकाबंदीवेळी पोलिसांनी वाहन चालविण्याचा परवाना, वाहनांची कागदपत्रे तपासण्याबरोबरच ब्रिथ अॅनलायझर मशिनद्वारे मद्यपी चालकांचा शोध घेतला. त्यावेळी पंधराजण मद्यधुंद स्थितीत वाहने चालविताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. तसेच सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या पाचजणांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.