आमदार एकनाथ खडसे यांचे गिरीश महाजनांना थेट आव्हान

जळगाव : गिरीश महाजन तब्बल सहा टर्म आमदार राहिले आहेत. त्यांनी आता लोकसभा निवडणुकीपासून पळ न काढता आपल्याविरुद्ध रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असे थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. ते म्हणाले, की गिरीश महाजन मला लोकसभेला उभे राहा, असे म्हणतात त्यांनी ते मला सांगण्याची गरज नाही.
माझी उमेदवारी पक्षाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगाव येथे रावेर लोकसभा मतदारसंघातून जाहीर केली आहे. जर हा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला, तर आपणही निवडणूक लढविण्यास तयार आहोत, आपणही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. गिरीश महाजन यांनीही पक्षातर्फे रावेरमधून आपल्याविरुद्ध निवडणुकीच्या मैदानात उतरावे, त्यांनी लोकसभेच्या मैदानातून पळ काढू नये.
भाजपचे नेते विनोद तावडे जुन्या भाजप नेत्यांना पक्षात जवळ करीत असल्याची चर्चा आहे. आपण पुन्हा भाजपमध्ये जाणार काय? याबाबत बोलताना ते म्हणाले, की विनोद तावडे लोकसभेत भाजप उमेदवारांचा विजय व्हावा, यासाठी पक्ष भक्कम करीत आहे, हे निश्चित आहे.
त्यांचे आपले संबंधही चांगले आहेत. परंतु आपला भाजपने प्रचंड छळ केला आहे, माझ्या चौकशा केल्या आहेत. मला पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडले आहे. आजही मला त्रास दिला जात आहे. त्यामुळे आपला भाजपमध्ये घरवापसी करण्याचा कोणताही विचार नाही.