बिहारमध्ये सरकार वाचविण्यासाठी राजदची संतोष मांझीला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दल बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,राजदने माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा मुलगा संतोष सुमन मांझीला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे.
हिन्दुस्तान आवाम मोर्चाचे नेते संतोष सुमन मांझी यांनी नितीश कॅबिनेटमधून जून 2023 मध्ये राजीनामा दिला. जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाकडे चार आमदार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, असदुद्दीन ओवैसीच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनकडून (AIMIA) राष्ट्रीय जनता दलाने समर्थन मागितलय. AIMIM च्या एका आमदाराला सोबत घेण्यासाठी राजदचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपा खासदार नित्यानंद राय यांना जीतन राम मांझींना सोबत घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
बिहार विधानसभेत सध्या राजदचे 79 आमदार आहेत. राष्ट्रीय जनता दल बिहार विधानसभेतील मोठी पार्टी आहे. त्याशिवाय भाजपाचे 78, जदयूचे 45, काँग्रेसचे 19, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे चार, माकपाचे 2, AIMIM चा 1 आणि एक अपक्ष आमदार आहे.
बिहारच्या विद्यमान राजकीय स्थितीवर भाजपाचे आमदार तारकिशोर प्रसाद यांनी सांगितलं की, “बिहार भाजपाच्या काही नेत्यांना बैठकीसाठी बोलवण्यात आलं होतं. लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. भाजपा बिहारच्या हिताचा आणि देशाच्या विकासावर निर्णय घेते. राजकारणात दरवाजे कधीच बंद होत नसतात. पक्षाच केंद्रीय नेतृत्व बिहारच्या हिताचा निर्णय घेईल”