या अधिवेशनातून मराठा समाजाच्या हाती काहीही लागणार नाही : राज ठाकरे

मुंबई : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या विशेष अधिवेशन बोलावलं आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे उद्या होणाऱ्या अधिवेशनातून मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र या अधिवेशनातून काहीही हाती लागणार नाही, अशी रोखठोक भूमिका आज राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून मांडली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले की, “यामध्ये काहीही होणार नाही. हा विषय राज्याचा नाहीच. हा विषय केंद्र सरकारचा आणि सुप्रीम कोर्टाचा आहे. आरक्षण देण्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर झाल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही. या सगळ्यातून फक्त झुलवलं जातं. यातून काहीही हाती लागणार नाही. मी त्या दिवशी हे होणार नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्यासमोरच जाऊन सांगितलं होतं,” अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे.
दरम्यान, विशेष अधिवेशनातून काहीही हाती लागणार नाही, या राज ठाकरेंच्या भूमिकेवर राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.